शेतकऱ्याचं लेकरु जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकात झळकलं, बुलडाण्याच्या राजू केंद्रेची मोठी झेप
फोर्ब्स मॅगझिननं नुकतेच प्रसिद्ध केलेल्या यादीत बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या पिंप्री खंदारे येथील शेतकरी कुटुंबातल्या राजू केंद्रे (Raju Kendre) चे नाव आलं आहे.
बुलडाणा: फोर्ब्स मॅगझिननं नुकतेच प्रसिद्ध केलेल्या यादीत बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या पिंप्री खंदारे येथील शेतकरी कुटुंबातल्या राजू केंद्रे (Raju Kendre) चे नाव आलं आहे. सध्या राजू केंद्रे सातासमुद्रापार म्हणजेच लंडन मध्ये चेवनिंग स्कॉलरशिप वर SOAS युनिव्हर्सिटीस ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. फेब्रुवारी 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या (Forbes) यादीत फोर्ब्स 30 अंडर 30 मध्ये त्याचा समावेश आहे. एव्हढेच नव्हे तर फोर्ब्स ने त्याच्यावर एक स्टोरी सुद्धा प्रसिद्ध केलीय. यामुळे या शेतकरी पुत्राचं बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कौतुक होत आहे. फोर्ब्स इंडियाच्या यादीत नाव आल्यावर राजू केंद्रे वर एक स्टोरी सुद्धा प्रसिद्ध झाली असून लवकरच ऑनलाईन यादी ही प्रसिद्ध होईल. शिक्षणाचा गंध ही नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून राजू केंद्रेनं झेप घेतली.
एकलव्य इंडियाच्या माध्यमातून काम
लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याचे भाग्य राजू केंद्रे ला मिळालं आहे. आई -वडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केले आहे. राजू हा एकलव्य इंडियाच्या माध्यमातून करिअर विषयी मार्गदर्शन ही करतो. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामिण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करणायचा प्रयत्न ही करत असतो.
अनेक राजू तयार व्हावेत
राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम आहे. त्याचे आई – वडील शेतकरी असून त्यांचा राहणीमान अगदी साधं आहे. मात्र, आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केलेत. त्यामुळे राजू आज छोट्याशा गावातून लंडनला गेला आणि आता फोर्ब्सच्या यादीत झळकला. राजूच्या आई वडिलांना मुलाच्या यशाचा सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजू सारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
राजू केंद्रेची प्रतिक्रिया
अनपेक्षित! ? पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याचं हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या ‘Forbes 30 Under 30’ यादीत आलंय.
आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात. pic.twitter.com/TUD6T30TX6
— Raju Kendre (@RajuKendree) February 7, 2022
जागतिक स्कॉलर घडवण्यासाठी मोहीम आखुया
राजू केंद्रे यांनं फोर्ब्जच्या यादीत नाव आल्यानंतर ट्विट आणि फेसबुक पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.”पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याच हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत आलंय. आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात, असं राजू केंद्रे यानं म्हटलं आहे.
इतर बातम्या
‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी