मुक्ताईनगर: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकांची सत्ता असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. दूध संघ आपल्या ताब्यात राहावा म्हणून एकनाथ खडसे यांनी जीवाचे रान सुरू केले आहे. तर या निवडणुकीत खडसे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपला डाव मांडला आहे. या खेळीचाच एक भाग म्हणून खडसे यांच्या स्नुषा, भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सासऱ्या विरोधात सून असे चित्र निर्माण झाले आहे. रक्षा खडसे या निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरून सासऱ्याच्या सत्तेला सुरुंग लावणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पद्मश्री लोन येथे शेतकरी विकास पॅनलच्या मतदारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील, किशोर आप्पा पाटील, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण आणि दूध संघाचे मतदार उपस्थित होते. दूध संघाचा हा शेवटचा मेळावा होता, असं आयोजकांनी स्पष्ट केलं.
यावेळी रक्षा खडसे यांनी जोरदार भाषण करून मतदारांचं लक्ष वेधलं. जळगाव जिल्हा दूध संघ सहकार क्षेत्रातील निवडणूक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मला सहकार क्षेत्राचा अनुभव कमी असल्याने मला त्या संदर्भात जास्त सांगता येणार नाही. पण दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसे पुढे नेता येईल याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
शेतकऱ्यांना मजबूत करायचं असेल तर एक चांगलं व्यवस्थापन जिल्हा दूध संघावर देण्याची गरज आहे. शेतकरी विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी याच व्यासपीठावरून एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रक्षा खडसे यांचं तोंडभरून कौतुक केलं. मुक्ताईनगरच्या पवनभूमीत काही लोकांना थांबवण्यात आलं ते चाळीसगाववाल्यांनी थांबवलं. काही लोकांमध्ये मी पणाची भावना होती. आता ती टिकून राहिली नाही. मी पणाच्या भावनेमुळेच त्यांना पक्षातून जावं लागलं, असा हल्लाबोल मंगेश चव्हाण यांनी केला.
आता जिथे गेले आहात. तेथील लोकांना सांभाळा. त्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की, ते आमच्याकडे आल्याने आमचा ताण वाढला. रक्षाताई इथे असल्याने मला जास्त बोलता येत नाही. एकनाथ खडसेंच्या घरात रक्षाताई सारख्या पवित्र गृहिणी आहेत. त्यामुळे खडसे चुकीचे काम करत असूनही उतरता काळात खडसे यांना चांगले दिवस आहेत, असा टोला त्यांनी लगावला.