‘त्या’ ऑडिओ क्लिप खोट्या असल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच; सूर्यकांत दळवींचं कदमांना आव्हान
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपाला शिवसेना माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा चोख प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टात जाऊन खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावे.
रत्नागिरी: शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपाला शिवसेना माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा चोख प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टात जाऊन खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावे, असं खुले आवाहनही सूर्यकांत दळवी यांनी कदम यांना दिलं आहे.
रामदास कदम हेच शिवसेनेचे महा गद्दार आहेत. 2004 मध्ये नारायण राणे पक्ष सोडून गेले त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांना घेऊन पक्ष सोडण्याची भूमिका याच रामदास कदम यांनी बजावली होती, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. 2014 मध्ये मला पाडण्याचे काम रामदास कदम यांनी केलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे.
दळवींनी मुलाविरोधात काम केलं
दरम्यान, रामदास कदम यानी आज पत्रकार परिषद घेऊन सूर्यकांत दळवींवर टीका केली होती. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण संजय कदमने भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. कदमला गाडून आम्ही भगवा फडकवला. परबने मिटिंग बोलावली या मिटिंगला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवीने संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादी 9, शिवसेनाला 5 जागा. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. हा निष्ठावंत कसा? असा सवाल रामदास कदम यांनी केला होता.
माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं. संजय कदमला तिकीट मिळावं म्हणून वारंवार प्रयत्न केले. पण माझ्या मुलाला तिकीट मिळालं. तो निवडून आला. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकदाही माझ्या मुलाचा फोन उचलला नाही. उलट संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात मनसेचे वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम परब यांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली होती.
आरोप नैराश्यातून
मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही कदम यांच्यावर टीका केली आहे. रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून आहेत. माझे महात्मा गांधी एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते? मातोश्री किंवा शिवसेनेचा आदेशही ते पाळत नाहीत. ही तर त्यांची कदम सेना आहे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय?