Darshana Pawar Death Case : दर्शना पवार हत्याकांडप्रकरणी मराठा समाज आक्रमक; सकल मराठा समाजाचा नगरमध्ये मोठा मोर्चा

| Updated on: Jun 22, 2023 | 10:12 AM

दर्शना पवार हत्याकांडाचा निषेध म्हणून आज मराठा समाज कोपरगावात मोर्चा काढणार आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Darshana Pawar Death Case : दर्शना पवार हत्याकांडप्रकरणी मराठा समाज आक्रमक; सकल मराठा समाजाचा नगरमध्ये मोठा मोर्चा
darshana pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नगर : एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शन पवार हिच्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. आधी आठ दिवस दर्शना गायब होती. त्यानंतर तिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह आढलला. त्यानंतर तिचा खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. पण तिचा मृतदेह सापडून तीन दिवस झाले तरी तिच्या मारेकऱ्याला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दर्शनाला कुणी मारले? कशासाठी मारले? तिच्यासोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे कुठे गेला? त्याचं काय झालं? आदी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे मराठा समाजातही संतापाची लाट पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

दर्शना पवारच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरणार आहे. सकल मराठा समाजाने आज कोपरगावात मोर्चाची हाक दिली आहे. कोपरगावात हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मोर्चानंतर मोर्चेकरी पोलिसांना आपल्या मागण्याचं निवेदन देणार आहेत. दर्शना पवार हिच्या मारेकऱ्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. तिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मारेकऱ्याला कठोर शिक्षा करा

दर्शना पवार हिच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. दर्शनाच्या हत्येने आम्हाला धक्का बसला आहे. आरोपींना पोलिसांनी शक्य तितक्या लवकर शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी दर्शनाचे मामा उत्तम आगळे यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर यांची मागणी

दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही मागणी केली. राजगडावर दर्शना पवार या तरूणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याचा तातडीने पोलीसांनी शोध घेतला पाहिजे. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. जे कोणी आरोपी असतील त्यांची गय करता कामा नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

काय आहे प्रकरण?

दर्शन पवार हे एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. त्यानंतर तिच्या कोचिंग अकादमीत तिचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर ती तिच्या काही मित्रांसोबत ट्रेकिंगला गेली होती. तिच्यासोबत तिचा मित्र राहुल हंडोरेही होता. आठ दिवस गायब असलेल्या दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडावर सापडला होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिची हत्या केल्याचं उघड झालं. दरम्यान, तिचा मित्र राहुल हंडोरे हा सुद्धा गायब आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढलं आहे.