सांगली : सांगली शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली. मुल्ला यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी योग्य संधी साधत मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या आहेत.
सांगलीत काही दिवसांपूर्वीच भरदिवसा दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे आपल्या राहत्या घराच्या दारात बसले होते. यावेळी काही हल्लेखोर आले. त्यांनी नालसाब यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते तिथून पसार झाले.
नालसाब मुल्ला यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विश्रामबाग पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव आणि इतर पोलीस अधिकार घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय. अज्ञात आरोपी हे गजबजलेल्या परिसरात आले. त्यांनी गोळीबार केला. नंतर ते तिथून लगेच पळूनही गेले. पोलीस आता आरोपी नेमके कोणत्या दिशेला पळून गेले, हल्ल्याचं नेमकं कारण काय, नेमकं काय घडलंय, याची सविस्तर माहिती घेत आहेत.