जतमध्ये कलह, भाजपच्या माजी नगरसेवकानेच आपल्या सहकार्याला संपवलं? माजी आमदाराचे पोलिसांवर ताशेरे

| Updated on: May 15, 2023 | 11:41 PM

जतमधील विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास करण्यात आला. याप्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. तर एका आरोपीला फरार घोषित करण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासावरुन भाजपच्या माजी आमदाराने गंभीर आरोप केला आहे.

जतमध्ये कलह, भाजपच्या माजी नगरसेवकानेच आपल्या सहकार्याला संपवलं? माजी आमदाराचे पोलिसांवर ताशेरे
Follow us on

सांगली : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये 17 मार्च 2023 ला भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलेली. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगली पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.

खरंतर घटना घडली त्याचदिवशी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली. यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यातही घेतलेलं. पोलिसांनी या प्रकरणी संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण या चौघांना अटक केलेली.

भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत हा या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असून, तो फरार आहे. उमेश सावंत याच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण याच आरोपांप्रकरणी आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगली पोलिसांवरच आरोप केले आहेत.

हे सुद्धा वाचा

माजी आमदार विलासराव जगताप यांचे नेमके आरोप काय?

विजय ताड खून प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करण्यात आली. ताड यांच्या खुनाच्या प्रकरणात सावंत यांना न्यायालयाने फरार घोषित करण्याआधी पोलिसांनी फरार घोषित करत 25 हजारांचे बक्षीस जाहीर केलं. सावंत यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत केलेली मोक्का कारवाई देखील बेकायदेशीर आहे. यामागे तासगाव आणि आटपाडीतील राजकीय नेते मंडळींचा दबाव आहे. तपास करणाऱ्या उपाधीक्षक अश्विनी शेळके यांच्याकडून हा तपास काढून घ्यावा. या सर्वच प्रकरणाची चौकशी करून संबंधितांच्या वर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.

या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रालय मुख्य सचिव आणि विधी-न्याय विभाग यांच्याकडे तक्रार करून सांगली पोलिसांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती विलावराव जगताप यांनी दिली.

पोलिसांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, जगताप यांनी केलेल्या आरोपांबाबत सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी खुलासा केलाय. विजय ताड यांच्या खूनामधे उमेश सावंत हा पाचवा आरोपी म्हणून निष्पन्न झाल्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच हे संघटीत कृत्य असल्याने मोक्क्याचे कलम वाढवण्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाचवा आरोपी पोलिसांना हवा आहे. यासाठी जे माहिती देतील त्यांना बक्षीस पोलिसांनी जाहीर केल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.