राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच हत्या, हत्या कशी झाली? हत्येपूर्वी काय घडलं?; ‘त्या’ घटनेने सांगली हादरली
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची त्याच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी आधी आठ राऊंड फायर केल्यानंतर नालसाब मुल्ला यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
सांगली : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांची त्यांच्या घरासमोरच हत्या करण्यात आली. घराबाहेर बसलेले असताना 8 जण आले आणि त्यांनी नालसाब मुल्ला यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांगली परिसर हादरून गेला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटू नये म्हणून पोलीस अलर्ट झाले आहेत. तसेच पोलिसांनी या हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
सांगली शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नालसाब मुल्ला असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून ही हत्या करण्यात आली. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे. सर्व हल्लेखोर बुलेटवरून आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर हल्लेखोर हे पसार झाले आहेत. रात्री साडे आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
पोलिसांचा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुल्ला यांच्या घराबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयितांवर पोलीस नजर ठेवून असल्याची माहितीही सूत्रांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर निवांत बसले होते.
यावेळी चार अज्ञात इसम त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी मुल्ला यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्यामुळे मुल्ला यांनीही या अज्ञातांना झापण्यास सुरुवात केली. त्यावेळी या अज्ञातांनी मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले. त्यामुळे मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
त्यामुळे मुल्ला यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुल्ला यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला. पूर्व वैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.