Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच डेंग्यू आजारातून बाहेर पडल्याची बातमी ताजी असताना आता दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनादेखील डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
शंकर देवकुळे, Tv9 मराठी, सांगली | 14 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांनादेखील डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांची तपासणी केल्यानंतर आज आलेल्या रिपोर्टमधून डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बरेच दिवस अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. तसेच ते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबतही दिल्लीला गेले नव्हते. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ते उपस्थित नव्हते. आजारपणामुळे अजित पवार मराठा आरक्षणासाठीच्या सरकारच्या बैठकीतही अनुपस्थित होते.
अजित पवार आता आजारपणातून बरे झाले आहेत. अजित पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर त्यांची आणि शरद पवार यांची भेट देखील घडून आली आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांची भेट घडून आली. त्यानंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर आज पुन्हा गोविंद बागेत स्नेह भोजणाच्या कार्यक्रमानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. अजित पवार एकीकडे डेंग्यूतून सावरले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे.
‘शक्य तितक्या लवकर…’
जयंत पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. “काही दिवस विश्रांती घेऊन शक्य तितक्या लवकर दैनंदिन आणि पक्षाच्या कामकाजाला सुरुवात करणार”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावं, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याशिवाय आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आजारपणातून लवकर बाहेर पडणं हे पक्षासाठी महत्त्वाचं आहे.
जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडूनही या वृत्तावर दुजोरा देण्यात आला आहे. “प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे “, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.