आता संजय राऊत यांच्या निशाण्यावर चार राजे; शंभुराजे यांना चंबू म्हणाले, इतरांवर काय टीका?
विकृत स्वभावामुळे राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जात आहे. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना जरा मोजूनमापून विधानं केली पाहिजे. मी राऊतांना ओळखत नाही आणि महत्त्वही देत नाही.
सातारा : रोज शिंदे गटावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता आपला मोर्चा दुसरीकडे वळवला आहे. संजय राऊत यांनी आता थेट चार राजांवर टीका केली आहे. यापैकी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह शंभुराजे देसाई यांच्यावरही संजय राऊत यांनी तोंडसुख घेतलं आहे. छत्रपती घराण्याने भाजपला साथ दिल्यामुळे संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. तर, शंभुराजे देसाई हे शिंदे गटासोबत गेल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राऊत यांच्या या टीकेला शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे यांनी कडक भाषेत उत्तर दिलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी काल साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात माजी खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील राजांवर केली होती.
शिवेंद्रराजे यांचा करारा जवाब
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेचा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे. संजय पवार यांना राज्यसभेचं तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिवसेनेने केले. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीकाही शिवेंद्रराजे यांनी केली आहे.
कोण शंभु की चंबू? : राऊत
राऊत यांनी मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. अनेक लोक शिवसेना सोडून गेले. पण शिवसेनेची बस कधी रिकामी राहिली नाही. आपली बस नेहमी फुल्ल असते. पुढून 50 उतरले तर मागून 100चढतात. आपली बस नेहमीच फुल असते. काय ते पाटणचं पापाचं पित्तर कोण ते? शंभु की चंबू ? अरे शिवसेना नसती तर तुझ्या घराण्याला मंत्रीपद मिळालं असतं का? 37 वर्षानंतर तुम्हाला मंत्रीपद मिळालं. तुमच्या घराण्याला मिळालं, असं हल्ला संजय राऊत यांनी चढवला होता.
बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव होऊन गेलं. त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसेनेला ताकद देण्याचं काम बाळासाहेब देसाई यांनी केलं. हे आम्ही विसरणार नाही. अन् ही कालची कार्टी. आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. त्यांना काय वाटतं शिवसेना संपणार आहे? तुमचे शंभर बाप आले पाहिजे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला होता.
राऊतांच्या डोक्यावर परिणाम : शंभुराजे
संजय राऊत यांच्या डोक्यवर 100 टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्थेवर टीका करत आहेत. आता ते माझ्यावर टीका करत आहेत. मी 3 टर्म आमदारकीला निवडून आलो आहे. मी शिवसेनेते प्रवेश केला त्यानंतर पाटणमध्ये शिवसेना वाढली. आम्ही प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या विचारांनी काम केले. हे संजय राऊतांना माहीत नसेल. जो आमचा मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला होता. तेथे तीन वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आणला. जे संजय राऊत कधी ग्रामपंचायतला निवडून आले नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर हल्ला चढवला. संजय राऊत आमच्या मतावर राज्यसभेत गेले. त्यामुळे आधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हानच त्यांनी राऊत यांना दिलं.
त्यात ठाकरे गट कुठे असेल? : शंभुराजे
महाविकास आघाडी 200 जागा जिंकणार असल्याचं ते म्हणत आहेत. मग त्यात उद्धव ठाकरे यांचा गट कुठे असेल ते सांगा. काल कसब्यात काँग्रेसचा विजय झाला तरी जल्लोष हा ठाकरे गटाने जास्त केला. मविआत ठाकरे गट राहते की नाही हा प्रश्न आहे .शिवसेना हे नाव आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे आता तो शिवसेना ठाकरे गट नसून फक्त उद्धव गट आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.
आता तर निर्लज्जपणाची हद्द झाली : उदयनराजे
खासदार उदयनराजे भोसले यांनीही संजय राऊत यांच्या टीकेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. विकृत स्वभावामुळे राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जात आहे. ही विकृती वाढत चालली आहे. राजघराण्यावर बोलताना जरा मोजूनमापून विधानं केली पाहिजे. मी राऊतांना ओळखत नाही आणि महत्त्वही देत नाही. त्यांनी आम्हाला छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, इथपर्यंत त्यांची विकृती पोहोचली.
सत्तेत राहण्यासाठी हे लोक काहीही बरळत असतात. केवळ राजकीय स्वार्थासाठी विधानं करत असतात. आता तर निर्लज्जपणाची हद्द झाली. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राऊत यांच्यावर हल्ला चढवला.