Mahesh Shinde : जनतेचा विचार करुन शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, शिवसेना आमदाराचं वक्तव्य
जनतेचा विचार करून शरद पवार साहेब (Sharad Pawar) रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.
सातारा: साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Shivsena MLA Mahesh Shinde) आक्रमक झाले असून त्यांनी पवार घराण्यावर निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.जनतेचा विचार करून शरद पवार साहेब (Sharad Pawar) रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.
रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी 40 लाख मागितले जातात
महेश शिंदे यांनी रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. आज रयत मध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात असल्याच्या चर्चा असल्याचा गंभीर आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
समाजातील जाण नसलेल्यांना रयतवर घेतलं जातंय
माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अश्यना या संस्थेवर घेतल्याची टीका करत जनतेचा विचार करून पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले रयतच्या बॉडीवर नसल्यानं खदखद
खासदार उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे.राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे, असंही महेश शिंदे म्हणाले. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक 9 जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
इतर बातम्या:
Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यात कारचा भीषण अपघात, 4 जण ठार
Satara Shivsena MLA Mahesh Shinde said Sharad Pawar will resign from Chairman post of Rayat Shikshan Sanstha