मोठी बातमी ! राज्यपाल कोश्यारी यांच्या त्या निर्णयाची चौकशी करा; शरद पवार यांची मागणी
केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती.
वर्धा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे. पण राज्यपाल म्हणून त्यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल रमेश बैस हे कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, पवार यांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवे राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? राज्यपाल कोश्यारी यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी.
आधीच निर्णय घ्यायला हवा होता
केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
विजनवास की पुनर्वास
दरम्यान, केंद्र सरकारने देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. मात्र, कोश्यारी यांची कोणत्याही राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे कोश्यारी यांना भाजप विजनवासात पाठवणार की त्यांचं पुन्हा पुनर्वसन करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्व्हेचा परिणाम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकताच सर्व्हे आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मोदी सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना हटवलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रातील सरकार हे अदानीचं चौकीदार आहे. त्यामुळे केंद्राने राज्यपालांना बदललं तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचंच काम केलं. त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागणार आहे, असं पटोले म्हणाले.