मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला शून्य जागा मिळणार, मोठा दावा कुणाचा?; भाकीत खरं ठरणार?
शिंदे आणि भाजपचं राज्यात एकत्र सरकार आहे. मात्र, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपने मिशन 144 चा नारा दिला आहे.
जळगाव: एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना घेऊन राज्यात सत्तांतर घडवून आणले. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत या युतीला चांगलं यश मिळालं. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाला अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेत शिंदे गटाला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी वेगळाच दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांच्या दाव्यानुसार शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत शून्य जागा मिळणार आहेत.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. सद्यस्थितीत शिंदे गट एक स्टेप मागे आला असून येणारा तीन-चार महिन्यात शिंदे गट हा बॅक स्टेजला येणार असल्याची टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला शून्य जागा मिळतील. त्याशिवाय जे 40 आमदार शिंदे यांच्यासोबत गेले, त्यांचं काय होणार हे लवकरच दिसेल. हा 40चा आकडा शून्यार जातो की बोटावर मोजण्या इतपत राहतो हे सुद्धा दिसेल. येणाऱ्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल. अजून काही दिवस थांबा. दिल्लीत बहोत दूर नही है, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, पाटील यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गट खरोखरच बॅकफूटला जाणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
शिंदे आणि भाजपचं राज्यात एकत्र सरकार आहे. मात्र, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपने मिशन 144 चा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गावा गावात जाऊन पक्ष वाढवण्याचं काम सुरू केलं आहे.
दुसरीकडे शिंदे गटाने निवडणुकीची अजून कोणतीही तयारी सुरू केलेली नाही. शिंदे गटाला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष नेमता आलेले नाहीत. तसेच संघटनात्मक बांधणीवरही जोर देण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातही पक्षाची बांधणी करण्यात येत असल्याचं चित्रं नाहीये. त्यामुळे शिंदे गटाचं काय होणार? अनिल पाटील यांचं भाकीत खरं ठरणार काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.