Nagar Panchayat Election result 2022: मतदारांनी दिलं, ईश्वर चिठ्ठीने हिरावून नेलं; वाचा, कोणत्या उमेदवारांचं ईश्वर चिठ्ठीने भाग्य फळफळलं?
नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी दणदणीत मते मिळवली आहेत. काही उमेदवारांना तर मतदारांनी समसमान मते दिल्याने अनेक ठिकाणी ईश्वर चिठ्ठी काढावी लागली आहे.
जळगाव: नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी दणदणीत मते मिळवली आहेत. काही उमेदवारांना तर मतदारांनी समसमान मते दिल्याने अनेक ठिकाणी ईश्वर चिठ्ठी काढावी लागली आहे. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीत अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काहीचं याच ईश्वर चिठ्ठीने भाग्य फळफळलं आहे. त्यामुळे जनतेनं दिलं पण ईश्वर चिठ्ठीने हिरावून नेलं अशी जोरदार चर्चा आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत 17 जागांपैकी 6 जागांचा निकाल समोर आला असून यात राष्ट्रवादीचे 3 उमेदवार तर शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर विजयी झाले आहेत.
सोयगावात शिवसेना उमेदवार विजयी
औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायत दोन उमेदवारांना समसमान मेत पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोबडे विजयी झाले आहेत. जाफराबाद नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागांवर विजय मिळाला आहे. या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपाचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.
दादा भुसेंना धक्का
नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत कृषी मंत्री दादा भुसे यांना धक्का बसला आहे. या नगरपंचायतीत भाजप 8 तर शिवसेना 6 जागांवर विजयी झाली आहे. माकपने 2 तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. या नगरपंचायतीत भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे मंत्री असून ही नगरपंचायत राखता न आल्याने दादा भुसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
वडेट्टीवारांनी गड राखला
चंद्रपूरच्या सिंदेवाही नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले आहे. सिंदेवाही नगरपंचायतीच्या 17 पैकी 12 जागांवर काँग्रेस, 2 जागांवर भाजप तर 1 जागेवर अपक्ष विजयी झाला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नगरपंचायत राखण्यात यशस्वी ठरले आहे.
Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : नगरपंचायतीची रणधुमाळी, निकाल जाहीर होण्यास सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला https://t.co/JuNLlK8O6K#Election2022 | #NagarPanchayatElections2022 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2022
संबंधित बातम्या: