काय चोरायला आले आणि काय घेऊन गेले… स्मशानभूमीतून चक्क अस्थीच चोरल्या; गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले
पंढरपूरमध्ये एक विचित्र चोरी झाली आहे. चोरट्यांनी स्मशानभूमीतून चक्क सोन्यासाठी अस्थीच चोरल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पंढरपूर : प्रसिद्ध लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्मशानातील सोनं अशी एक कथा लिहिली होती. स्मशानातून सोनं शोधणाऱ्याची ही कथा होती. अण्णा भाऊ साठे यांनी चार दशकापूर्वी ही कथा लिहिली. या कथेमुळे एकच खळबळ उडाली होती. उपेक्षितांचं अंतरंग या कथेतून उलगडण्यात आलं होतं. आज चार दशकानंतर असाच एक प्रकार पंढरपुरात घडला आहे. मात्र, यात थोडा फरक आहे. काही चोरटे येथील एका स्मशानभूमीत सोनं चोरी करण्यासाठी आले होते. पण त्यांना सोनं मिळालं नाही. त्यामुळे या चोरट्यांनी चक्क अस्थीच चोरून नेल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पंढरपूर येथील हिंदू स्मशान भूमीतून मृत व्यक्तीच्या अस्थी गायब झाल्या आहेत. सोने चोरण्याच्या हेतूने चोरट्यांनी चक्क मृत रखुमाबाई देवकर यांच्या अस्थीच स्मशानभूमीतून गायब केल्या आहेत. त्यामुळे देवकर कुटुंबीयांना टाहोच फोडला आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच झाल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या निमित्ताने स्मशानभूमीही सुरक्षित नसल्याची चर्चा होऊ लागली आहे.




पोलिसात तक्रार दाखल
मृत्यूनंतरही अहवेलना झाल्याने नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तीला दहन करण्यापूर्वी त्याच्या अंगावर सोनं ठेवण्याची प्रथापरंपरा आहे. मात्र, हेच सोनं राखेतून चोरून विकल्या जात आहे. रखुमाबाई देवकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी देवकर कुटुंबीय राख सावडण्यासाठी स्मशानभूमीत आले. तेव्हा स्मशानभूमीतून अस्थीच गायब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले.
काही चोरट्यांनी सोनं चोरण्यासाठी अस्थीच गायब केल्याचं लक्षात आल्यानंतर देवकर कुटुंबीयांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून अस्थी मिळवून देण्याची मागणीही केली आहे. तर, नगरपालिका प्रशासनाचे स्मशानभूमीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांना धक्काच बसला
राख सावडण्यासाठी देवकर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक आणि काही गावकरी स्मशानभूमीत आले होते. पण तिथे आल्यावर त्यांना धक्काच बसला. स्मशाभूमीतून अस्थी गायब होत्या. त्यामुळे देवकर कुटुंबीयांची रडारड सुरू झाली. नातेवाईकांनीही आहे तेवढी राख सावडली. काही राख गोळा केली आणि विधीवत पूजा करून नदीत सोडली. मात्र, स्मशानातून थेट अस्थीच चोरीला गेल्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत एकच चर्चा सुरू झाली आहे.