चंद्रपूर : राज्यात व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या मान्यवरांना राज्य सरकारने महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार दिला. मात्र, चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानं या पुरस्कर्त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. पुढील एक महिन्यात शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी संदर्भात पुनर्विचार करावा. अन्यथा 9 ऑगस्ट क्रांती दिनी शासनाने दिलेले पुरस्कार त्यांना परत करु, असा गर्भीत इशारा देण्यात आलाय. हा निर्णय घेणाऱ्यांमध्ये राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार मिळालेल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि मान्यवरांची समावेश आहे. याबाबत त्यांनी सरकारला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली (Social activist going to return their awards on Chandrapur alcohol issue).
या पत्रात म्हटलं आहे, “वर्धा, गडचिरोलीत दारूबंदी आहे आणि चंद्रपूरची दारुबंदी नुकतीच मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अट्टाहासापायी उठवण्यात आली आहे. शासनाच्या या ‘व्यसनवर्धक’ नीतीच्या विरोधात व्यसनमुक्त महाराष्र्ट समन्वय मंचाने शासनाचे “राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार” परत करण्याचं आवाहन केलं. याला पुरस्कार्थींनी उस्फृर्त प्रतिसाद दिलाय.”
पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी निर्णय, दारु बंदी व्यसन मुक्तिसाठी आम्ही निर्भय” असे राज्यव्यापी अभियानही मंचाचे वतीने राबविण्यात आले. त्या अभियान समारोप प्रसंगी शासनाला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिवस व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवशी संबंधित पुरस्कार्थींनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना ते पुरस्कार परतीचे पत्र देवून सुचित केले आहे.
“एकीकडे महाराष्ट्र शासनाकडून राज्यात व्यसनमुक्ती कार्य करणार्या व्यक्तीला सन्मानित करून व्यसन मुक्ती कार्याकरीता प्रोत्साहित करते. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेवून खूलेआम दारू पिण्यास जनतेला प्रोत्साहन देते आहे. हे शासनाचे कार्य परस्पर विरोधी तसेच जनहीत विरोधी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी विविध आंदोलन करणार्या महीलांचा घोर अपमान आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. चंद्रपूर जिल्हा दारु बंदी पुन्हा लागु करण्यात यावी. तसेच दारुबंदीची योग्य व प्रभावी अंमलबजावणी करावी आणि वर्धा व गडचिरोली जिल्हातील दारु बंदी उठविण्याच्या हालचाली त्वरीत बंद कराव्यात,” असे आवाहन या कार्यकर्त्यांनी
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे.
आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिऴालेला “राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार” सरकारला परत करीत आहोत असे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, व तहसिलदार यांना देणार आहे. महाराष्ट्रातील इतरही पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी या आंदोलनात
सहभागी होण्याचे आवाहन, नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या राज्य सरचिटणीस वर्षा विदया विलास आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलंय. तसेच राज्य निमंत्रक व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांनीही हे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :