सोलापूर ग्रामीण पोलिसांचं ऑपरेशन परिवर्तन, हातभट्टी व्यायवसायिकांना व्यवसायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न, तेजस्वी सातपुतेंची संकल्पना
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 71 गावांमध्ये हातभट्टी गाळण्याचा व्यवसाय केला जातो , अशा व्यवसायातून लोकांना परावृत्त करून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शेती,उद्योग ,व्यापार करण्यासाठी मदतीसाठी 71 गावाची जबाबदारी ग्रामीण पोलिसांवर देण्यात आली आहे.

सोलापूर: सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून 71 गावांमध्ये ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अवैधरित्या हातभटट्टी चालवणाऱ्यावंर कारवाई करुन देखील वारंवार त्यांच्याकडून पुन्हा तेच काम करण्यात येत होते. वारंवार हातभट्टीवर छापे टाकणे, अशा प्रकारच्या कारवाया सुरु होत्या. पण, तो व्यवसाय करणाऱ्यांवर काही परिणाम होत नसल्याचं दिसून येतं होतं. त्यामुळे हातभट्टी चालवणाऱ्या व्यवसायिकांचं आणि तरुणांचं समुपदेशन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलांच्यावतीनं ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
Operation Parivartan begins…. Visits at 71 hotspots by Solapur R police…. Raids, counselling and the beginning of the change pic.twitter.com/goRMWxO12s
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) September 4, 2021
ऑपरेशन परीवर्तन का सुरु करण्यात आलं?
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून हातभट्टीची दारू गाळण्याबाबत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येतात. दारुभट्टी उद्धवस्त केली जाते. जुलै 2019 पर्यंत 1498, जुलै 2020 पर्यंत 1722 आणि जुलै 2021 पर्यंत 2459 गुन्हे दाखल झाले आहेत. इतक्या प्रमाणात गुन्हे दाखल होऊन देखील हातभट्टीची दारू काढणाऱ्यांवर काही परिणाम होत नसल्याचं दिसून आलं होतं. हातभट्टीची केस झाल्यावरही सदर व्यक्ती काही कालावधीनंतर पुन्हा हातभट्टीची दारु काढतात. ते या अवैध कृत्यापासून कायमचे परावृत्त होत नाहीत. हातभट्टीच्या केसेसमध्ये कलम भा.द.वि. 328 काही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करताना लावत नाहीत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना जामीन मिळतो व कायद्याचा धाक न राहिल्यानं ते पुन्हा अवैध कृत्याकडे वळतात. हातभट्टीच्या अवैध दारुबाबत दाखल केसेस मध्ये शिक्षा लागल्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
ऑपरेशन परिवर्तनची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर
सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू काढली जाते त्या ठिकाणांची यादी आणि गाव पोलीस अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आले आहे. अवैध दारु निर्मिती कायमची थांबवण्याच्या दृष्टीनं सातत्यानं व नियमित उपाययोजना ऑपरेशन परिवर्तन उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांवरील जबाबदारी
संबंधित ठिकाणांना वेळोवेळी आठवड्यातून किमान 2 वेळा भेटी द्याव्यात. अवैध हातभट्ट्या, रसायन, दारू मिळून आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करणे. संबंधित लोकांना हातभट्टीची दारू काढण्यापासून परावृत्त करणे. परावृत्त झालेल्या लोकांशी संपर्कात राहावे. सन्मानजनक व्यवसायांसाठी मार्गदर्शन करणे. कायदेशीर आणि सन्मानजनक व्यवसायांसाठी लागणारे कर्ज, शासकीय मदत याविषयी त्यांना माहिती मिळावी यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन गाव आणि पोलीस स्टेशन पातळीवर घडवून आणावे. परावृत्त झालेल्या कुटुंबातील तरुण मुलांनी भविष्यात सदर अवैध कृत्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी त्यांना करिअर मार्गदर्शन करावे, त्यांच्या सतत संपर्कात हाहावे. त्यांना देखील गाव आणि पोलीस स्टेशन पातळीवर मार्गदर्शन करण्यात यावं.
दर महिन्याला मिटींग
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 71 गावांमध्ये हातभट्टी गाळण्याचा व्यवसाय केला जातो , अशा व्यवसायातून लोकांना परावृत्त करून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शेती, उद्योग, व्यापार करण्यासाठी मदतीसाठी 71 गावाची जबाबदारी ग्रामीण पोलिसांवर देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम सुरु केला असून 71 गावातील लोकांना हातभट्टी दारू गाळण्यापासून परावृत्त करण्यात येणार आहे. दर महिन्याला मिटींग घेत या उपक्रमाचा आढावा घेतला जाणार आहे.
इतर बातम्या:
Solapur Rural Police started initiative Operation Parivartan for stop illegal liquor production under the guidance of SP Tejaswi Satpute