Chandrapur NEET : चंद्रपुरात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची धांदल, केंद्रांवर पोचण्यासाठी अडचणींचा सामना, प्रशासनाने उभारल्या सुविधा
पावसाच्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुढं ढकलण्यात यावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. पण, प्रशासनानं आपण अडचण होईल म्हणून ही परीक्षा नियोजित वेळी घेतली.
चंद्रपूर : प्रचंड पूर आणि पाऊस ( Flood and Rain) परिस्थितीत चंद्रपुरात आज नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची (Students) धांदल उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बारा केंद्रांवर चार हजारांवर विद्यार्थी नीट परीक्षा देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच नीट परीक्षांसाठी केंद्रांची सोय झाली आहे. याआधी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नागपुरात परीक्षेसाठी प्रवास करावा लागत होता. जिल्ह्याच्या विविध भागांमधून परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनंत अडचणींचा सामना केला. चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन तासांपासून पाऊस कोसळतोय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नीट परीक्षा पुढे ढकलली जावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र सध्या केंद्र प्रशासनाने सर्व यंत्रणा कामी लावत परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी सुविधा (Facilities) उभारल्या आहेत.
सिरोंच्याचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
यापूर्वी नीटची परीक्षा नागपूरला होत होती. ही परीक्षा चंद्रपुरात व्हावी, अशी विद्यार्थी-पालकांची मागणी होती. या मागणीनुसार पहिल्यांदा यंदा चंद्रपुरात नीटची परीक्षा झाली. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. अशात ही परीक्षा झाल्यानं विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सिरोंचा येथील विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. कारण सिरोंच्यावरून चंद्रपूरकडं येणारा रस्ता पुरामुळं बंद आहे. चंद्रपुरात पावसात येणाऱ्या विद्यार्थी-पालकांची त्रेधातिरपट उडाली. बरेच जण रेनकोट घालून आले होते. काही जण पावसात ओले झाले. त्यांच्या राहण्याची कुठलीही व्यवस्था चंद्रपुरात करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांची व्यवस्था प्रशासनानं परीक्षेपुरती केली. त्यामुळं विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.
खड्ड्यांतून मार्ग काढत गाठले चंद्रपूर
पावसाच्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुढं ढकलण्यात यावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. पण, प्रशासनानं आपण अडचण होईल म्हणून ही परीक्षा नियोजित वेळी घेतली. त्यामुळं विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ झाली. ग्रामीण भागातून येताना विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला. पावसामुळं रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढत त्यांना यावं लागलं. चंद्रपुरात आल्यानंतर परीक्षा केंद्र शोधण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. शेवटी परीक्षा झाली. पण, विद्यार्थ्यांचे हाल झाले.