Ajit Pawar : अजित पवार यांना देहूच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डावलण्याचा प्रयत्न, हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, कार्यकर्ते आक्रमक
Ajit Pawar : अजित पवार यांना भाषणाची संधी देण्याची आम्ही पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पण त्यांनी आमची विनंती फेटाळून लावली. हा आमच्यावर अन्याय आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
अमरावती: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे आज देहूत होते. यावेळी त्यांनी शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना भाषणातून डावलण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषण करण्याची संधी दिली. पण अजित पवार यांना भाषणाची संधी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सुप्रिया सुळे (supriya sule) या प्रचंड संतापल्या आहेत. ही तर दडपशाही आहे. अजित पवारांचं भाषण होऊन न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्या मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत घोषणाबाजी देत भाजपचा निषेध नोंदवला. जाणूनबुजून अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
अजित पवार यांना भाषणाची संधी देण्याची आम्ही पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पण त्यांनी आमची विनंती फेटाळून लावली. हा आमच्यावर अन्याय आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण व्हायला हवं होतं. फडणवीसांचं भाषण झालं. पण अजितदादांना संधी दिली नाही. ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम करण्यात आलं आहे. हा अन्याय आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रोटोकॉल पाळला गेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं?
देहूच्या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूलाच अजित पवार बसले होते. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. कार्यक्रमात सर्वात आधी फडणवीसांनी भाषण केलं. त्यानंतर सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव भाषणासाठी पुकारलं. त्यावेळी मोदीही अचंबित झाले. त्यांनी हातवारे करत अजित पवारांना भाषणाची संधी का नाही? असा सवाल केला. तेव्हा अजित पवार यांनीच मध्यस्थी करत तुम्ही भाषण करा, अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना केली. त्यानंतर मोदी भाषणाला उभे राहिले. पण अजित पवारांना भाषणापासून डावलल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे.
सरकार निवडणुकांध्ये व्यस्त
यावेळी महागाईवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार निवडणुकीसाठी अधिक व्यस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची किंमत वाढली आहे. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. निवडणुका येतील आणि जातील, असं त्या म्हणाल्या.
दोघांनाही एकदिवस क्लिनचीट मिळेल
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या दोन्ही मंत्र्यांवर कोणतीही केस नाही. ज्याच्यावर आरोप झाला. त्याला अटक करण्यात आली. तो माफीचा साक्षीदार झाला. पण देशमुख यांच्या घरावर 109 वेळा धाड मारण्यात आली. हा विश्वविक्रम झाला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. नवा मलिक यांच्याविरोधातही कोणताही पुरावा नाही. लढेंगे आणि जितेंगे हे लिहून ठेवा. एक दिवस दोघांनाही क्लिनचीट मिळेल, असंही त्या म्हणाल्या.