डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा; रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी
महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.
महाड : दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील गावांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळून मनुष्यहानी होत आहे. राज्यात दरड कोसळून अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत. तळीये गावात दरड कोसळून एकाचवेळी 40 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. नवीन गावे वसवावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केली. महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आठवलेंनी ही मागणी केली. या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. (Survey and rehabilitate hill villages, Ramdas Athawale inspects Talaye accident site)
तळीयेतील दरड दुर्घटनेवेळी 41 लोकानी घराबाहेर पडून रस्त्याच्या दिशेने धाव घेऊन आपला जीव वाचविला तर अन्य लोक दरडीखाली दबले गेले. घटनास्थळी 8 फुटांचा ढिगाऱ्याचा थर आहे. त्यात अद्याप 33 लोक दबले आहेत. आज 7 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र मृतदेहांचे अवयव तुटून बाहेर निघत असल्याने मृतदेह बाहेर काढणे थांबवून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्याने त्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले, रिपाइंचे सिद्धार्थ कासारे, नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
तळीये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्याचे होईल त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून देण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. महाड शहरात ही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक घरांचे तसेच व्यापारी, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या दुकानदारांकडे विमा नाही त्यांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
मदतकार्यासाठी मुंबई मनपाची 2 पथके रायगड, कोल्हापूरच्या दिशेने रवाना
बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी मनपा क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथके रायगड आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड आणि कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करीत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.
कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनि:स्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.
इतर बातम्या
VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो
(Survey and rehabilitate hill villages, Ramdas Athawale inspects Talaye accident site)