म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बोट दाखवत सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
जर सावरकरांनी ज्ञानेश्वरांवर टीकात्मक लेखन केले तर मग सावरकरांवर टीका करणार का? श्री श्री रविशंकर आणि इंदूरीकर महाराज यांनी देवांवर केलेली टीका चालते का?
सोलापूर: उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं गेलं हा आजही चर्चेचा विषय आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत वारंवार सांगितलं आहे. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं गेलं? असा सवाल विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. हे उत्तर देतानाच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बोट दाखवलं आहे. सोलापूरमधील महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.
अजित पवार, अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले नसते म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत.
म्हणजे महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाकडे दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे हे फडणवीस यांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
आता चार मंत्र्यांचा कार्यक्रम लावलाय. सगळे शिंदे गटातले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे गेले त्यातील 20 माणसे बाजूला काढली जाणार, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
मनसेकडून सुषमा अंधारे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यावरूनही त्यांनी मनसेवर टीका केली. सरकारमधील नेतेच शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. या नेत्यांचा मनसे राजीनामा का मागत नाही? पण मनसे म्हणते की, सुषमा अंधारे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अरे माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
महापुरुषांबद्द्ल हे लोक जाणीवपूर्वक स्टेटमेंट करतात. आपले लक्ष विचलीत करण्यासाठी सातत्याने बोलतात. मूळ मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी ते असं करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातील ज्ञानदेवांवर केलेले टीकात्मक लेखन दाखवत प्रश्न उपस्थित केला. जर सावरकरांनी ज्ञानेश्वरांवर टीकात्मक लेखन केले तर मग सावरकरांवर टीका करणार का? श्री श्री रविशंकर आणि इंदूरीकर महाराज यांनी देवांवर केलेली टीका चालते का? असा सवाल करतानाच देवेंद्रजी तुम्हाला चॅलेंज देते.
हे सगळे चुकीचे चालले असेल तर मग प्रकाशन समित्या बंद करणार का? तुमच्यात हिंमत असेल तर आंबेडकर आणि फुले खोट बोलत होते हे समोर येवून सांगा. देवेंद्रजी तुम्हाला काय वाटले, तुम्ही वार कराल आणि मी पळून जाईल असे वाटले का? मी चळवळीतील कार्यकर्ती आहे, असं त्या म्हणाल्या.