जनता महागाईने त्रस्त, नद्या कोरड्या झाल्या, गारपीटीनं शेतकऱ्यांना फटका; यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न
नैसर्गिक संकट आणि शेतमाला बाजारभाव नसल्यामुळे आता शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे आपली बाजू मांडली असली तरी राज्याचा विरोधी पक्ष मात्र त्रस्त जनतेसाठी कोणत्याही हालचाली करताना दिसून येत नाही.

कोल्हापूर : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती प्रचंड गदारोळीची आहे. त्यामुळे सरकारही अस्थिर असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील जनता सरकारवर नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी काही भागात चार वेळा अवकाळी आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे. तर दुसरीकडे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनता या सरकारवर आणि विरोधकांवरही नाराज आहे अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
हे सरकार अस्थिर असल्याने कोणत्याही बाबतीत या सरकारकडून कोणाच्या अपेक्षाही पूर्ण होताना दिसून येत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनता अनेक संकटांनी त्रस्त आहे.
तर दुसरीकडे सरकारकडून कोणतीही ठोस उपाय योजना अंमलात आणली जात नाही त्यामुळे जनता सत्ताधाऱ्यांवरही आणि विरोधकांवर तीव्र नाराज असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
देशात महागाईने कळस घाटला आहे. जनसामान्य माणसांचे महागाईमुळे जगणे अशक्य झाली असून महागाईमुळे जनता आता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे निसर्गानेही पाठ फिरवली आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक नद्या आता कोरड्या पडल्या आहेत. शेतीला आणि पिण्याच्या पाण्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात चार वेळा गारपीटाचा फटका बसला आहे, तरीही हे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.
राज्यातील जनता आणि शेतकरी एकीकडे प्रचंड त्रस्त असताना दुसरीकडे मात्र या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय भूकंप येणार अशी अवयी उठवली जात असल्याचा घणाघात त्यांनी सरकारवर आणि विरोधकांवर केला आहे.
नैसर्गिक संकट आणि शेतमाला बाजारभाव नसल्यामुळे आता शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे आपली बाजू मांडली असली तरी राज्याचा विरोधी पक्ष मात्र त्रस्त जनतेसाठी कोणत्याही हालचाली करताना दिसून येत नाही. त्यामुळे राज्याच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.