देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात चंद्रपूरच्या सागवानाच्या लाकडाची चौकट, नव्या संसद भवनाशी अनोखे काष्टबंध
देशातील सर्वच राज्यातील लाकूड व्यापारी खरेदीसाठी येत असतात. बल्लारपूर येथे नित्याप्रमाणे होणाऱ्या जाहीर लिलाव प्रक्रियेत नारसी कंपनीचे अधिकारी सहभागी झाले.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरासाठी चंद्रपूरच्या सागवान लाकडाची चौकट मिळाली आहे. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा पुरवठा करण्यात आलाय. अशा प्रकारे नव्या संसद भवनाशी चंद्रपूरचे अनोखे काष्ठबंध तयार झालेत. राज्याच्या वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर विभागाने यासाठी ऑगस्ट 2021 पासून 800 घनमीटर सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड नवी दिल्लीला रवाना केले. नवी दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास येत असताना याची उभारणी करणाऱ्या टाटा कंपनीने नारसी अँड असोसिएट या कंपनीला अंतर्गत सजावटीचे काम दिले होते. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मंत्राचा जागर लक्षात घेत या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी देश-विदेशातील सर्व सागवान लाकडाचे आधी चाचणी घेतली.
मजबुती-चकाकीसाठी सागवान प्रसिद्ध
मजबुती-चकाकी आणि लाकडी वस्तूचे अभिजात सौंदर्य टिकून राहत असल्याचे सर्व निकष पूर्ण केल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या सागवान लाकडाला अंतिम पसंती मिळाली. बल्लारपूर येथे आशिया खंडातील सर्वात मोठा शासकीय लाकूड लिलाव बाजार आहे.
येथेच देशातील सर्वच राज्यातील लाकूड व्यापारी खरेदीसाठी येत असतात. बल्लारपूर येथे नित्याप्रमाणे होणाऱ्या जाहीर लिलाव प्रक्रियेत नारसी कंपनीचे अधिकारी सहभागी झाले. देशातील मध्य प्रांत अर्थात सेंट्रल प्रोविंस भागातील CP teakwood जगात प्रसिध्द आहे.
परदेशातही पाठवले जाते सागवान
हे लाकूड व्यापाऱ्यांच्या मार्फत परदेशातदेखील पाठवले जाते. अंतर्गत सजावट करणाऱ्या कंपनीने जगातील अन्य ठिकाणच्या सागवान लाकडाची या प्रकल्पासाठी चाचणी केली. त्यानंतरच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वनविकास महामंडळाच्या लाकडावर मान्यतेची मोहोर उमटविली.
सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या लाकडापैकी बहुतांश लाकूड गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली जवळच्या वेलगुर जंगलातील असल्याची माहिती पुढे आली आहे. जगात देखण्या ठरणाऱ्या भारतीय संसदेच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पात चंद्रपूरच्या सागवान लाकडाला मिळालेले स्थान गौरवास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ही इमारत भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमान सांगणारी असणार आहे. त्यामुळे यात चंद्रपूर-गडचिरोली येथील टिकाऊ सागवानाचा वापर अभिमानाचा विषय ठरलाय. असं बल्लारपूर वनविकास महामंडळ आगारचे सहायक व्यवस्थापक गणेश मोतकर यांनी सांगितलं.