Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप
अर्जुनीचा संभा बावणे याचा नाना पोईनकर यांच्या मुलाशी वाद झाला होता. या वादात चारगाव येथे कुऱ्हाडीने वार करून नाना यांचा संबाने खून केला होता. ही घटना दोन जुलै 1996 सालची. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संभा बावणे याला खुनाच्या आरोपात जन्मठेपाची शिक्षा सुनावली.
चंद्रपूर : शेगाव पोलीस (Shegaon Police) ठाण्यातअंतर्गत अर्जुनी येथे नाना चिंधू पोईनकर (वय 60) हा राहत होता. चिवडा विकून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मुलगा तुकाराम व पुतण्या रामचंद्र पोईनकर यांच्यासोबत पानठेल्यावर पैशाच्या कारणावरून (For the sake of money) संभा बावणे (Sambha Bawane) याच्याशी वाद झाला. संभाने तुकाराम याला पानठेल्याबाहेर ओढून मारहाण केली. तसेच तुकारामांच्या घरी जाऊन त्याच्या आईलाही शिविगाळ केली. त्यामुळे, तुकाराम याने रामचंद्र याला सोबत घेऊन शेगाव पोलीस स्टेशन गाठले. चारगाव खुर्द येथे बाजारात चिवडा विक्रीचा धंदा करून नाना पोईनकर मित्रासह अर्जुनीकडे परत येत होता. नाना समोर व मित्र मारोती जुंबाडे मागे चालत होते. ईरई (चारगाव) नदी वाटेवर आंब्याच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या संभाने नाना पोईनकर याला हाक मारली.
अशी घडली घटना
नाना पोईनकर थांबल्यानंतर ‘तुझा मुलगा तुकाराम कुठे आहे?’, अशी विचारणा करीत वाद घातला. राग अनावर झाल्याने संभाने नानाच्या डोक्यावर कुर्हाडीने जबरदस्त प्रहार केला. नाना रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नानाच्या मागूनच येणार्या त्याच्या मित्राने हा घटनाक्रम बघितला. संभाचा अवतार बघून त्याने पळ काढला. गावातील पोलीस पाटील यांना घटनेविषयी सांगितले. मारोती जुंबाडे याच्या फिर्यादीवरून शेगाव ठाण्यात संभा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी म्हणून एपीआय कृष्णा तिवारी, पीएसआय इ. एस. मेंढे यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले.
बावीस वर्षे लपून होता आरोपी
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. रुई खैरी (नागपूर) येथे आरोपी कुटुंबासह राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेरा फेब्रुवारी 2019 रोजी न्यायालयात हजर केले. संभा आपली ओळख लपवून गेल्या बावीस वर्षांपासून बंडू विठ्ठल बावणे या नावाने वावरत होता. सरकारी वकील मिलिंद देशपांडे यांनी पाच साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने या केसचा अंतिम निकाल गुरुवार, 17 मार्चला लागला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी संभा बावणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अधिवक्ता मिलिंद देशपांडे यांनी बाजू मांडली.