Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा बीडचा दौरा अचानक रद्द; पंकजा-फडणवीस एकाच मंचावर नाहीच!
पण पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने चर्चा रंगल्या आहेत. फडणवीस आणि पंकजा मुंडे या बऱ्याच महिन्यानंतर एकाच मंचावर येणार होत्या. प
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाने पक्षात येण्याची ऑफर दिल्यानंतर पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याने पंकजा मुंडे यांच्यावरून शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच राजकीय पतंगबाजी रंगली होती. मात्र, बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची बातमी आली. त्यामुळे पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावरून काय बोलणार? अशी चर्चा रंगली होती. पण पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना पाचारण करण्यात आलं होतं. महिनाभरातील फडणवीसांचा हा दुसरा बीड दौरा असणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दौरा होता.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द झाला आहे. धनंजय मुंडे हे रुग्णालयात असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तब्बल 22 वर्षानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर अनुपस्थित राहणार आहेत. तर पंकजा मुंडे यांनीही गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला आहे.
पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंकजा मुंडे दरवर्षी सातत्याने गहिनीनाथ गडावर येत असतात. पण पहिल्यांदाच त्यांनी हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. या गडावरील कार्यक्रमाला आता फक्त देवेंद्र फडणवीस हे एकटेच जाणार आहेत.
पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याने ठाकरे गटाने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे गहिनीनाथ गडावरून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आपली भूमिका मांडतील असं सांगितलं जात होतं.
पण पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने चर्चा रंगल्या आहेत. फडणवीस आणि पंकजा मुंडे या बऱ्याच महिन्यानंतर एकाच मंचावर येणार होत्या. पण पंकजा यांनी दौराच रद्द केल्याने पंकजा मुंडे आणि फडणवीस एकाच मंचावर येण्याचा योगही टळला आहे.
गहिनीनाथ गडावरील आजच्या महोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून सहा ते सात लाख भाविक गडावर जमण्याची शक्यता आहे. त्यासाठी तब्बल 500 क्विंटल महाप्रसाद बनविण्यात आला आहे. दरम्यान प्रीतम मुंडे या सकाळी दर्शनासाठी गडावर पोहचतील, असं सांगितलं जात आहे.