लष्करातील जवान सुटीवर आला, त्याची ही सुटी शेवटचीच ठरली, जमिनीचा वाद जीवावर उठला
गावात जमिनीवरून वाद झाला. यात १० ते १२ गावगुंडांनी जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. जवानाचा मृत्यू झाला.
कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : वाद गावागावात होत असतात. त्यातून काही दुर्घटनाही होतात. जमिनीच्या वादातून दरवर्षी काही ना काही दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना नगरमध्ये घडली. गावातील एक जवान लष्करात भरती होता. तो सुटीवर गावी आला. गावात जमिनीवरून वाद झाला. यात १० ते १२ गावगुंडांनी जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे जवानाची लष्करातील सुटी ही शेवटची सुटी ठरली. आता या घटनेवरून गावात तणावाचे वातावरण आहे. गावगुंडांवर कारवाई व्हावी, यासाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
शेतीच्या वादातून दुर्घटना
सुट्टीवर आलेल्या जवानावर शेतीच्या वादातून हल्ला करण्यात आलाय. बायजाबाई जेऊर गावातील वाघवाडीत ही घटना घडलीय. लष्करातील जवान अशोक नामदेव वाघ हे सुट्टीवर आले होते. शेतीच्या वादातून त्यांच्यासह कुटुंबावर भावकी आणि शेजाऱ्यांनी सिनेस्टाईलने हल्ला केला. 10 ते 12 गुंडांनी हातात लाकडी दांडके, कोयता, कुऱ्हाड अशा तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.
जवानाचा मृत्यू, आठ जण जखमी
या हल्ल्यात जवान अशोक वाघ यांच्यासह कुटुंबातील आठ जण जखमी झालेत. जखमींवर अहमदनगरचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या कित्येक दिवसांपासून गुंडांचा हैदोस सुरू आहे. मात्र एमआयडीसी पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी
या घटने संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनला दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावगुंडांचा बंदोबस्त त्वरित करावा. अन्यथा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दोन गटात झालेला हा वाद भयानक होता. लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. या राड्यामुळे गावातील वातावरण दूषित झाले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला असला तरी हा वाद आणखी किती दिवस पेटत राहणार काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलिसांना वाद शांत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.