रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ॲडव्हान्स कोर्सेस या उपकेंद्रात सुरु करण्यासाठी विद्यापीठाने प्राधान्य द्यावे, असं मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. त्यांच्या हस्ते रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, एमआयडीसी, रत्नागिरी येथे रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठचे नामकरण चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून नामकरण आणि लोकमान्य टिळक अध्यासन (अभ्यास व संशोधन) केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई विद्यापीठ,रत्नागिरी उपपरिसरास चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ.धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले.हा नामकरण सोहळा आज माझ्या उपस्थितीत संपन्न.लोकमान्य टिळक अध्यासन केंद्राचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.नगराध्यक्ष बंड्या साळवी,सुमित कीर,जयु भाटकर,कुलसचिव डॉ.गायकवाड व संबंधित उपस्थित. pic.twitter.com/OPKFZmFBKd
— Uday Samant (@samant_uday) August 1, 2021
उदय सामंत म्हणाले, “चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांनी जे साहित्य लिहून ठेवलं आहे, त्यांचे जे कार्य आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिपस्तंभाप्रमाणे उभे राहिले पाहिजे. यासाठी त्यांचे नाव उपकेंद्राला देण्याची मागणी 6 महिन्यात मान्य झाली. आजपासून रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ हे चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर रत्नागिरी उपपरिसर म्हणून ओळखलं जाणार आहे.”
“निसर्ग वादळात जी विद्यालयं बाधित झाली त्या आपद्ग्रस्त विद्यालयांना मदत करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील अध्यासन केंद्रांनाही निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोकणामध्ये ज्या ठिकाणी पूर आला त्या ठिकाणच्या विद्यालय, शैक्षणिक संस्था यांना उभे करण्यासाठी विद्यापीठ निधी देण्यासाठी तयार आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.
उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनीयरिंग कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेजच्या आवारात या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहेत. या ठिकाणी दोन कोर्सेस मर्जींग करुन इलेक्ट्रो-मॅकेनिक, सिव्हील-इन्फ्रास्ट्रक्चर आदी प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोर्सेस सुरु करणारे हे महाराष्ट्रातील पहिल कॉलेज असणार आहे. तसेच कवी कालीदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्रही या वित्तीय वर्षामध्ये सुरु होते.”
“शासकीय लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर व ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र, उर्दुभवन रिचर्स सेंटर आदि शैक्षणिक दालन रत्नागिरी येथे होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हे शैक्षणिक हब होईल. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ते शिक्षण येथेच उपलब्ध होणार आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील,रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, विद्यापीठाचे कुलसचिव (प्र.) डॉ. बळीराम गायकवाड, चरित्रकार पद्मभूषण स्व. डॉ. धनंजय किर यांचे नातू डॉ. शिवदिप किर, लोकमान्य टिळक अध्यासन मुंबई विद्यापीठाच्या प्र. संचालिका सुचित्रा नाईक, रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठाचे प्र. संचालक डॉ. किशोर सुकटणकर, जयु भाटकर, प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.