महाड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडमधील सभेतून पहिल्यांदाच पोलिसांना उद्देशून मोठं विधान केलं आहे. निवडणुका येतील जातील. पण 2024 साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल.तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही मोदींचे नाव घेवून या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. काहीतरी स्वीकारा. पोलीसांना पण सांगतो सरकार येईल. जाईल. हे सरकार हलायला लागलंय. कायद्याचा वापर करा, पण गैरवापर करु नका. मी माझी पातळी सोडली नाही. मला तशी गरज नाही, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
काहीही हातात नसतांना जमलेले आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी कसा होतो हे जगजाहीर. मला लिहिण्याची, सांगण्याची गरज नाही. तुम्ही शपथ घ्या भगवा कायम फडकत ठेवा. मी तुम्हाला राज्यात भगवा फडकवून दाखवतो, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी महाडकरांना दिली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावरून थेट भाजपलाच आव्हान दिलं. मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला प्रबोधकार शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय. भाजपचे हिंदुत्व काय आहे? गोमूत्रधारी. मेहबूबा मुफ्ती सोबत बसले. तुम्ही काय सोडले? भागवत मशिदीत गेले मी काही बोललो?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
देशासाठी लढणारा आमचा, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपची भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. बीजेपी आता भ्रष्ट जनता पार्टी झालीय. मेघालयात अमित शाहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. कुठे आहे हिंदुत्व? कुटुंब उद्ध्वस्त करायचे हे का तुमचं हिंदुत्व? मोदी व्यक्ती विरोधात नाही, वृत्ती विरोधात मी आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
भारत माता की जय म्हटले तो देशप्रेमी होत नाही. सैनिकाकडे बुलेट, जनतेकडे बॅलेट. सत्यपाल मलिकांकडे सीबीआय. इतर पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आज पंतप्रधान म्हणतायत मतदारांना बजरंगबलीचे म्हणा. मग तुमचे बळ, 56 इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी म्हणून भाजपला तडीपार करा, असं आवाहनच त्यांनी केलं.