महाराष्ट्रात राख, गुजरातमध्ये रांगोळी का?; उद्धव ठाकरे यांचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे बारसूतील कातळ शिल्पाचं नुकसान होईल. जागितक वारसा स्थळावर रिफायनरी नकोच. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू-सोलगाव येथील आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कातळ शिल्प परिसरालाही भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर बारसू रिफायनरीसारखे प्रकल्प राज्यात नको. महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी का? असा सवाल करतानाच कातळशिल्प परिसरात सॉईल टेस्ट केली जात असेल तर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे हे मीडियाशी संवाद साधत होते.
कातळ शिल्पाबाबत मला कल्पना होती. कातळ शिल्प जागतिक वारसा घोषित करावा म्हणून आपण युनेस्कोत प्रस्ताव दिला आहे. पण ही जागा वादग्रस्त रिफायनरीत येते हे मला हल्ली कळलं. मला या जागेबाबत माहीत नव्हतं. कातळ शिल्पाची जागा रिफायनरीत येते हे मला त्यावेळी कोणीही सांगितलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच या कातळ शिल्पाबाबत माझ्यापेक्षा रिसबूड साहेब अधिक सांगतील. या पठारावर अनेक कातळ शिल्प आहेत. प्रागतैहासिक काळातील ही शिल्प असावीत. किंवा अश्मयुगीन काळातील असावीत. हा पुरातन खजिना आहे. त्याची विल्हेवाट लागू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.



सॉईल टेस्टिंग नकोच
मी जसं रिफायनरीचं पत्र दिलं होतं. तसंच एक पत्र जागतिक वारश्यासाठी दिलं होतं. कातळ शिल्पाचा जागतिक वारसात समावेश व्हावा यासाठी मी हे पत्र युनेस्कोला दिलं होतं. आता गावकरी रिफायनरीच्या विरोधात उभे राहिले आहेत. या कातळ शिल्पामुळेच आपल्याला आपला इतिहास कळतो. गेंडा हा प्राणी पृथ्वीतलावर आहे त्या काळातील लोकांना कसं कळलं? त्यासाठीच त्यांनी कातळ शिल्प काढलं आहे. त्यामुळे या भागात सॉईल टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला तर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
डोकी फोडण्याचा घाट
आम्ही सर्व दादागिरीच्या विरोधात उभे आहोत. लोकांना न सांगता प्रकल्प लादला जात आहे, असं काय आहे या प्रकल्पात? असा सवाल त्यांनी केला. या प्रकल्पामुळे बारसूतील कातळ शिल्पाचं नुकसान होईल. जागितक वारसा स्थळावर रिफायनरी नकोच. सरकारने स्थानिकांशी संवाद साधावा. हुकूमशाहीनं प्रकल्प लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल. रिफायनरीसाठी डोकी फोडण्याचा घाट घातला जात आहे, असंही ते म्हणाले.