कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगला कारभार करत आहेत. मूळात उद्धव ठाकरे यांनीच ठरवलं होतं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. माझ्यावर शरद पवार यांनी दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लावलं असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. मग नाही तर मुख्यमंत्री शिंदे साहेबच राहिले असते ना? म्हणजे त्यांच्या मनात असलेले मुख्यमंत्रीच महाराष्ट्र राज्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी फारसं वाईट वाटून घेऊ नये, असा टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज कोल्हापुरात आहेत. यावेळी ते बोलत होते. यावेळी केसरकर यांनी उद्याच्या अयोध्या दौऱ्याचीही माहिती दिली. अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यात यावं अशी आमची इच्छा आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जे जे मराठी बांधव अयोध्येला जातील तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था होईल. इतकं भव्य आणि उत्कृष्ट महाराष्ट्र भवन बांधण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहेत. त्यातून योग्य काही घडेल असं वाटतं, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
चांगल्या कामाच्या सुरुवातीसाठी प्रभू रामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. रामराज्य ही चांगल्या राज्याची संकल्पना आहे, महाराष्ट्रात रामराज्य व्हायचं असेल तर अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच नातं दृढ होतंय, असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली तर ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेल, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोठ्या लोकांमध्ये आपण काही जास्त बोलायचं नसतं. जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांनी घेतला पाहिजे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतरही ते आले नाहीत. मोदी साहेबांना दिलेलं वचन त्यांनी मोडलं आहे. याला मी साक्षीदार आहे. हे जर झालं तर वरिष्ठ पातळीवरून होईल. मोठ्या भावाने लहान भावाला माफ केलं पाहिजे. जुळवून घेणं हे त्यांच्या हातात आहे. आम्ही प्रयत्न केले आहेत. मोदी साहेबांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण पुढे ते होऊ शकलं नाही. ही काळाच्या ओघात घडलेली गोष्ट आहे, असं केसरकर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसह अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे प्रभू रामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर मंदिर बांधणीच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शरयू किनारी महाआरती करणार आहेत. नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला परत रवाना होणार आहेत.