कोल्हापूर : अभिनेता अक्षय कुमार याच्या वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी 100 फूट खोल दरीत कोसळून जखमी झालेल्या एका 19 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पन्हाळ गडाच्या तटबंदीतून हा तरुण दरीत कोसळला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल दहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. काल सकाळी म्हणजे 28 मार्च रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
महेश मांजरेकर वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाची शुटिंग पन्हाळा गडावर सुरू होती. यावेळी घोड्यांची देखभाल करणारा तरुण नागेश प्रशांत खोबरे हा मोबाईल फोनवर बोलत होता. बोलता बोलता किल्ल्याच्या तटंबंदीजवळ तो आला आणि अचानक 100 फूट खोल दरीत कोसळला. अंधार असल्यामुळे त्याला किल्ल्याच्या तटबंदीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो 100 फूट खोल खाली दरीत कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीला आणि डोक्याला जबर मार लागला होता.
या दुर्घटनेनंतर लोकांनी दोरीच्या सहाय्याने दरीत कोसळलेल्या नागेशला बाहेर काढलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याला पुन्हा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवणय्ता आलं. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
सिनेमाच्या सेटवर नागेश घोड्यांची देखभार करत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. जखमी नागेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्च करण्याची जबाबदारी आम्ही घेत असल्याचं सिनेमाच्या युनिटने नागेशच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण गेल्या दहा दिवसांपासून युनिटकडून उपचाराचा खर्च देण्यात आला नसल्याचा आरोप नागेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. उपचाराचा खर्च न मिळाल्याने नागेशचे कुटुंबीय संतप्त आहेत. जोपर्यंत नागेशच्या उपचाराचा खर्च मिळत नाही, तोपर्यंत त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा त्याच्या कुटुंबीयांनी दिला होता.
महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठी वीर दौडले सातची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा ऐतिहासिक पट आहे. त्यात पहिल्यांदाच अक्षयकुमार काम करत असल्याने या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात शूरवीर मावळ्यांची कहाणी पाहायला मिळणार आहे.