एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार कोण?; बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा सवाल
साताऱ्यात अनेकांनी स्वार्थाच राजकारण केलं आहे. मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. समजनेवाले को इशारा काफी है. मी मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये स्वतःला बघतो. म्हणूनच मला बिग बॉस मधून अटक केली, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
सातारा | 31 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या रुपाने राज्यातील हे वर्षभरातील सर्वात मोठं बंड होतं. अजित पवार यांच्या या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. या बंडावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपले कयास व्यक्त केले. पण या सर्व घडामोडींपासून बिग बॉसफेम अभिजीत बिचुकले अलिप्त होते. पहिल्यांदाच त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणता तर अजित पवार कोण?, असा सवाल अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं सांगत एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातून बाहेर पडले. आता शिंदे कोणाच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे हा माझा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे जर गद्दार आहेत तर अजितदादा को? असा जनतेचा सवाल आहे, असा सवाल करतानाच अजित पवारांबद्दल विधान भवनामध्ये कोणीही बोलत नाही, त्याबद्दल अभिजीत बिचुकले यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
अजितदादांच्या मांडीला मांडी लावून का बसता?
बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांना उद्धव ठाकरेंनी राख फासली आहे, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने मला सोशल मीडियावर उचलून धरले. त्या सर्व लोकांचा मी आभारी आहे. अजित पवार यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीच्या घोटाळ्यावर भाष्य केलं होतं.
राष्ट्रवादीतील घोटाळ्यावर बोलता मग अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही जर भ्रष्टाचारांना बरोबर घेणार असाल तर मी पत्र लिहून जाब विचारणाच. लालूप्रसाद यादव यांना शिक्षा होऊ शकते तर या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसता? असा सवाल मी करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
पवारांची खेळी वाटत नाही
महाराष्ट्राला मी आशेचा किरण नक्कीच दाखवणार. विरोधी पक्षनेता जर सक्षम नसेल तर महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न कसे सुटणार? असा सवालही त्यांनी केला. शरद पवारांनी राजीनामा नाट्य केलं होतं. त्यावेळेस त्यांच्या राजीनाम्यासाठी सर्वात जास्त आग्रही अजित पवार दिसून आले. शरद पवारांची ही खेळी असावी असं मला अजिबात वाटत नाही, असंही ते म्हणाले.
उदयनराजे हे अजितदादांना घाबरतात का?
उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची ताकद लावून एक प्रकारे राजगादीचा अपमान केला होता. अजित पवारांच्या भूमिकेबाबत देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका ती माझी भूमिका असं विधान उदयनराजेंनी केलं होतं. पण उदयनराजेंना स्वत:ची भूमिका नाही का? उदयनराजे अजितदादांना घाबरतात का? असा सवालही त्यांनी केला.
राज्याचं राजकारण दिशाहीन
सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण हे तत्त्वहीन आणि दिशाहीन आहे. जनतेच्या आशांना आणि दिशांना धूळ चारणारं हे सध्याचे राजकारण आहे. महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करण्याची गरज आहे. मी या कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. मी जे केलंय ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.