Eknath Shinde : आरमोरीतील वैनगंगेच्या पुलावरून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी, पूरग्रस्तांसाठी पॅकेज घोषीत करणार का?
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठा पॅकेज घोषित करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती उद्भवू नये म्हणून एनडीआरएफसह अनेक पूर परिस्थिती नियंत्रण तुकड्या तयार करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आदेश देण्याची शक्यता आहे.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर (Waingange bridge in Armori) काही काळ थांबून त्यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना (Collector Sanjay Meena) व पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. साडेसात वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा गडचिरोलीतील नियोजन भवनात पोहचला. अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील.
पुरात तिघांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पूर आल्यामुळे कच्चा रस्ता वाहून गेला होता. भामरागड तालुक्यातील पेरमिली येथे पुरात एक ट्रक वाहून त्यात तिघांचा मृत्यू झाला. कुमरगुडा नाल्यात पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे एक विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग चार ठिकाणाहून पूर परिस्थितीमुळे बंद होता.
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected the flood situation on the Wainganga river bridge in Armori taluka of Gadchiroli district. DM Sanjay Meena and Superintendent of Police Ankit Goyal briefed about the water level and measures. pic.twitter.com/c04z0MzlTG
— ANI (@ANI) July 11, 2022
पॅकेज घोषीत करण्याची शक्यता
सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग खड्यांनी भरलेला असल्यामुळे याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. अहेरी तालुका मुख्यालयी तलावाचे पाणी 20 ते 22 घरामध्ये घुसले होते. त्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठा पॅकेज घोषित करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती उद्भवू नये म्हणून एनडीआरएफसह अनेक पूर परिस्थिती नियंत्रण तुकड्या तयार करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना आदेश देण्याची शक्यता आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना काँग्रेसकडून मदत
गडचिरोली पुरात वाहून गेलेल्या ट्रकमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबांना काँग्रेस पक्षाकडून आर्थिक मदत देण्यात आली. भामरागड तालुक्यातील पेरपिली येथे पुरात ट्रक वाहून तिघांचा मृत्यू झाला होता. या तीन कुटुंबांना ही काँग्रेस पक्षाकडून आर्थिक मदत देण्यात आली. आलापल्लीजवळील रामानंगट्टा येथे मृतकाच्या घरी जाऊन काँग्रेस पक्षांनी मदत केली.