नेहमीप्रमाणे तलावात पोहायला गेला, मात्र घरी परतलाच नाही, काय घडलं?
नेहमीप्रमाणे मित्रांचा ग्रुप तलावात पोहायला गेला. तलावात पोहण्याचा आनंद घेत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. यानंतर गावावर शोककळा पसरली.
विरार : तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. विनोद बिस्तुर कोळी असे मयत तरुणाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने कोळी पाण्यात बुडाले. कोळी हे बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर राजीव पाटील यांच्या जवळचे व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोळी हे अर्नाळा गावातील रहिवासी असून, त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले
विनोद कोळी आणि त्यांचा 4 ते 5 जणांचा मित्रांचा ग्रुप नेहमी विरार पूर्वेकडील भटपाडा येथील शिरगाव तलावात पोहायला जात होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी सुद्धा त्यांचा ग्रुप तलावात पोहायला गेले. पाण्यात उडी घेतली आणि तलावात पोहता पोहता ते बुडू लागले. नेहमी या तलावात पोहायला येत असूनही आज त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले आणि मृत झाले. आज सकाळी पावणे सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
नाशिकमध्ये बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
नाशिकच्या दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नरफाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत या तरुणांचे शोधकार्य सुरु होते. चेहडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असून नाशिक महापालिकेच्या चेहडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे. या ठिकाणी चार युवक अंघोळीसाठी गेले होते. यातील दोन युवक सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहूल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले. यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला.