निसर्गात वाचनानंद काही वेगळाच!, झेडपीचे विद्यार्थी शाळा परिसरात लुटतात आनंद
निसर्गाला आपण खरा गुरू मानतो. याच निसर्गात मुलं वाचन करत असतील तर तो आनंद काही वेगळाच. झेडपीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेला काहीसा हटके उपक्रम.
नांदेड : टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेमच्या जमाना आहे. विद्यार्थ्यांची वाचनाची गोडी कमी होत आहे. अवांतर विषयांच्या पुस्तक वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी. यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी झाडांच्या सानिध्यात मुक्त वाचनालयाची सुरवात केली. सकाळच्या सत्रात झाडाच्या थंडगार सावलीत विद्यार्ती बसतात. विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करतात. शाळेने सुरु केलेला हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
वाचनालय शाळेच्या दारी
लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील झेडपीची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. शाळेत एकूण ६६ विद्यार्थीसंख्या आहेत. मुख्याध्यापकांसह तीन शिक्षक आहेत. शालेय पातळीवर गोष्टींचा वार शनिवार, वाचन प्रेरणा दिवस, खाऊ प्रकल्प, लेखन वाचन हमी कार्यक्रम, वाचनालय शाळेच्या दारी असे विविध उपक्रम राबविले जातात.
झाडांच्या सानिध्यात मुक्त वाचनालय
मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि त्यांच्या सहशिक्षकांनी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढण्यासाठी एक उपक्रम राबवला. सुट्टया २ मेपासून सुरू होणार आहे. पण, वाचन संस्कृतीचा हा उपक्रम सुरू राहणार आहे. शाळा परिसरातील ३० ते ४० झाडांच्या सानिध्यात मुक्त वाचनालयाची सुरुवात केली.
दोरीवर टांगण्यात आलीत पुस्तकं
शाळेतील प्रांगणातील झाडांना दोरी बांधून त्यावर गोष्टींची, शूरविरांची, थोर, महापुरूषांची चरित्रे, वैज्ञानिकांची पुस्तके लटकवण्यात येतात. शाळेतील बाल वाचनालय, व्दिभाषीक अनुदान योजनेतून आणि दानशुरांनी पुस्तकं भेट दिलीत. ही पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येतात.
मुक्त वाचनालय हे दोन सत्रात चालवण्यात येते. पहिले सत्र सकाळी ८ ते ८.३० आणि दुसरे सत्र ९.३० ते १०.३० यावेळेत जवळपास लहान-मोठे असे ३० ते ४० विद्यार्थी वाचनासाठी येतात. वाचन झाल्यावर ते परत ठेवून देतात.
सुटीचा सदुपयोग
शासन निर्णयानुसार २१ एप्रिलपासून शाळेला सुट्ट्या लागल्या. तसेच शाळेचे काही उपक्रम सुरू असतील तर ते सुरु ठेवावेत असेही सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांच्या सुट्टीचा कालावधी आणि या कालावधीचा सदुपयोग व्हावा यासाठी झाडांच्या सान्निध्यात मुलांसाठी मुक्त बाल वाचनालय हा उपक्रम सुरू केला आहे. सकाळी दीड ते दोन तासांच्या दोन सत्रात तीस चाळीस विद्यार्थी वाचनास प्रतिसाद देतात. असं मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी सांगितले.