सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग, स्टेजवरुनच जाहीरपणे खुलासा
शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. ज्यांना महायुतीत तिकीट मिळणार नाही असं कळून चुकले आहे असे काही नेते शरद पवारांच्या पक्षात येण्यासाठी मुलाखती देत आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यानंतर भाजपला ही धक्का दिला आहे. एक बडा नेता आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आला आहे.
अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. स्टेजवरुनच जाहीरपणे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं कसं काम केलं हेही सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि बारामती लोकसभेवरुन गौप्यस्फोटही केला. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, असं मंचावरुन जाहीरपणे हर्षवर्धन पाटील म्हणाले. म्हणजेच महायुतीत असताना आपण सुनेत्रा पवारांऐवजी, सुप्रिया सुळे यांचंच काम केलं हे हर्षवर्धन पाटील यांनी मान्य केलं.
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून बारामती लोकसभेतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. ज्यात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. सुळे यांच्या विजयात कसा हात होता हे आता हर्षवर्धन पाटलांनीही सांगितलं आणि ते आकडेवारी वरुनही दिसतं. कारण सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा जास्त मतदान येथे झालं.
हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना 88 हजार 69 मतं पडली. तर सुप्रिया सुळे यांना 1 लाख 14 हजार 20 मतं मिळाली. म्हणजेच इंदापुरात 26 हजार 151 मतांची आघाडी सुळे यांना मिळाली. तर हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होताच शरद पवारांनी इंदापुरातून तिकीटही घोषित केलं आणि मंत्रिपदाचे संकेतही दिले आहेत.
इंदापुरातून तिकीट मिळणार नसल्यानंच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेतली. मात्र फडणवीस यांनी थांबवण्याचे प्रयत्न केले हे सांगतानाच आपल्यासमोर कसे पर्याय ठेवले गेले याचाही खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला. फडणवीस यांनी मात्र हर्षवर्धन पाटलांची जुनी बातमी असल्याचं सांगून अधिक बोलणं टाळलं.
इंदापुरातून लढण्यासाठीच हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली आणि त्यांना शरद पवारांनी तिकीट जाहीर केलं. आता इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचा सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणेंशी होणार आहे.