Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकाला जैन धर्मीयांशी जोडून राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल, की….
"रात्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व खासदारांनी इथे बसून चर्चा केली. आता आम्ही पुन्हा पक्ष कार्यालयात बसून चर्चा करु. आमची ठरलेली भूमिका तुम्हाला शेवटच्या क्षणी दिसेल" असं राऊत म्हणाले. विरोध आहे की पाठिंबा यावर राऊत म्हणाले की, 'काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात, त्या आम्ही करु'

“आम्हाला त्यांनी हिंदुत्व शिकवू नये. वक्फ बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. हे एक सामान्य बिल आहे. वक्फ बोर्डासंदर्भात बिल आलय, काही सुधारणा करायच्या आहेत. त्या सुधारणांना फक्त मुस्लिमांचाच विरोध नाही, तर आरएसएसचा सुद्धा पूर्ण पाठिंबा नाहीय. महाराष्ट्रात भाजपने औरंगजेबाची कबर तोडण्याची भूमिका घेतली, भाजपच्या या भूमिकेला संघाने विरोध केला. उगाचच वातावरण खराब करु नका असं त्यांनी सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे या बिलासंदर्भात संघाची त्याच पद्धतीची भूमिका आहे. हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा कोणी मेळ घालत असेल, तर तो मूर्खपणा आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
“या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे फडणवीस सांगू शकतील का?. इतर सुधारणाविधेयक असतात, तसं हे बिल आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर कब्जा मिळवणं काही उद्योगपतींना सोप जावं, त्यासाठी या बिलाच प्रायोजन दिसतय” असं संजय राऊत म्हणाले. “शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांना सपोर्ट केला. फडणवीस किंवा त्यांचे बगल बच्चे हे वक्फ बिलाच्या निमित्ताने बांग देतात हा मूर्खपणा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
वक्फ सुधारणा विधेयकावर ठाकरे गटाची भूमिका काय?
“आम्ही विरोधी पक्षात असताना भाजपाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिला. कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता आणि हिंदुत्वाशी संबंधित होता. तिहेरी तलाकच्या बिलाला विरोध केला नाही, कारण ते बिल गरीब मुस्लिम महिलांसाठी होतं. आता वक्फ बिलाचा विषय हा लाखो कोटी रुपयांच्या जमिनी संदर्भात आहे” असं संजय राऊत म्हणाले. “कोणाला तरी घुसवून या प्रॉपर्टी लाडक्या उद्योगपतीला देता येतील का? त्यासाठी झालेली ही पायाभरणी दिसते” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
‘हे मी मराठी माणूस म्हणून नाही, हिंदू म्हणून बोलतोय’
“देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्वाची इतकी काळजी आहे, मग विषय आता अल्पसंख्यांकाचा आहे, मुंबईत जैन धर्मीय हिंदुंना जागा नाकारतात. मग त्यासाठी असं एखाद बिलू आणून हिंदुंना जागा नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? हे मी मराठी माणूस म्हणून नाही, हिंदू म्हणून बोलतोय. मांसाहारी आहेत म्हणून मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथे जागा नाकारल्या जातात. हे भाजपचे लोक आहेत, जे मंत्रिमंडळात आहेत. आम्हाला जागा नाकारत आहेत, त्यासाठी वक्फ प्रमाणे एखाद बिल केंद्रात आणि राज्यात आणणार असतील, तर आमचाा पाठिंबा आहे” असं संजय राऊत म्हणाले.