Padalkar | वडेट्टीवारांकडून मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी अवस्था; पडळकरांची शेलकी टीका
पडळकर म्हणाले की, समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.
सांगलीः ओबीसी आरक्षणावर सारखे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अगदी शेलक्या शब्दांत टीका केली. वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याची टीका केली. शिवाय हे ओबीसी मंत्री जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत.
काय म्हणाले पडळकर?
सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यभरात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते असे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. थेट छगन भुजबळांपासून विजय वडेट्टीवारापर्यंत सारेच जण ओबीसी आरक्षणावरून भाजपवर जोरदार आरोप आणि टाकाही करत आहेत. वडेट्टीवारांचा आज सांगलीमध्ये भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी 450 कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पूर्णवेळ सचिव. आयोगाचे संशोधक सोलापुरात आणि आयोग पुण्यात. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केल्याची टीका त्यांनी केली.
प्रस्थापितांसाठी पोपटपंची
पडळकर पुढे म्हणाले की, समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा. हे ओबीसींच्या नावावर मंत्रिपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात, असा आरोपही त्यांनी केला. पडळकर पुढे म्हणाले, आता तर हद्दच झाली. उद्याच्या 17 जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. आणि त्या करिता उद्धव सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही, तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्यांची मुदत न्यायालयाला मागणार असे जाहीर केले. याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही. आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. त्यामुळे मी समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली