Pahalgam Terror Attack : हिंदू कोण विचारलं…हात वर केला अन्…पहलगाम हल्ल्यात लोकांना कसं मारलं?
ते विचारायला लागले की हिंदू कोण आणि मुस्लीम कोण असे आम्हाला विचारत होते. पण त्यांना कोणीही उत्तर दिलं नाही. आम्ही कोणीही वेगळे झालो नाही, अशी माहिती अनुषाक मोने यांनी दिली.

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सुन्न आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवली येथील तिघांचा समावेश आहे. याच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आज (24 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन पहलगामच्या हल्ल्यावेळी नेमकं काय झालं होतं? याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी आम्हाला आमचा धर्म विचारला. माझ्या पतींनी आम्ही काहीही करत नाही, बसून राहतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या पतीला गोळ्या घातल्या. तसेच तुमचा धर्म कोणता असे विचारत माझ्या बहिणीच्या नवऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या, अशी हृदयद्रावक माहिती हल्ल्यात मृत्यू झालेल्या अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी दिली.
नंतर अचानक फायरिंग चालू झाली
“आम्ही जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलो होते. तिथे भरपूर गर्दी होती. सगळे खूप खुश होते. सगळे आनंदी होते. आम्ही फोटो वगैरे काढत होतो. उन होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी गेलो. आमचं खाऊन झालं. त्यानंतर आम्हाला फायरिंगचा आवाज आला. पण आम्हाला वाटलं की पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे एखादा खेळ असावा, असं समजून आम्ही लक्ष दिलं नाही. पण नंतर अचानक फायरिंग चालू झाली. सगळीकडे गोंधळ उडाला. सगळेच लोक घाबरले. आम्ही सगळे खाली झोपलो,” असा थराराक अनुभव अनुष्का मोने यांनी सांगितला.
माझे पती म्हणाले की गोळ्या घालू नका, पण…
पण नंतर आम्हाला ते विचारायला लागले की हिंदू कोण आणि मुस्लीम कोण असे आम्हाला विचारत होते. पण त्यांना कोणीही उत्तर दिलं नाही. आम्ही कोणीही वेगळे झालो नाही. आमच्यातील एकजण बोलला की तुम्ही असे का करताय, आम्ही काय केलं?पण दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझे पती म्हणाले की गोळ्या घालू नका. आम्ही काहीही करत नाही. आम्ही इथे बसतो. ते बोलत असतानाच त्यांनाही गोळ्या घालण्यात आल्या, अशीही माहिती अनुष्का मोने यांनी दिली.
त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे?
आम्ही आमच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली. “परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे? असं विचारलं. माझ्या जिजूने हात वरती केला. त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. आमच्या घरातले कर्ते पुरुष होते. अशा बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारलं. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही माझ्या पतीला तसेच इतरांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही काहीच करू शकलो नाही,” असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी सांगितला. यादरम्यान दहशतवादी म्हणत होते की तुम्ही या ठिकाणी दहशत माजवली आहे. पण पर्यटकांनी तिथे नेमकं काय केलं? हे मला तरी समजलं नाही. सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही अनुष्का मोने यांनी केली.