राज्यात पावसाचे संकट, राज्य सरकारी कर्मचारी संपावर, पंचनामे कसे होणार
सरकारी कर्मचारी संपावर आहे. यामुळे अवकाळी पावसाचे पंचनामे रखडले आहे. शेतकरी वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवघड परिस्थितीत सरकारची साथ शेतकऱ्यांना हवी होती.
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : राज्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. आता पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात गहू, हरबरा पिके काही ठिकाणी काढली जात असताना हे संकट आले आहे. या अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटही शेतकऱ्यांसमोर आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. यामुळे पंचनामे रखडले आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला. सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. एक आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असताना पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण झाले नाही. त्याचवेळी दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले आहेत.
शेतकरी वाऱ्यावर
सरकारी कर्मचारी संपावर आहे. यामुळे पंचनामे रखडले आहे. शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवघड परिस्थितीत सरकारची साथ शेतकऱ्यांना हवी आहे. अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले याची माहिती पंचनामे झाल्यावरच मिळणार आहे. मात्र कर्मचारी संपामुळे पंचनामे कधी होणार असे काहीच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सरकारने यावर काहीतरी उपाय काढावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट
शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आलेली आर्थिक अडचण आणि चाऱ्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी आता आपले गोधन बाजारात विकायला सुरुवात केली आहे. हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी सर्जा राजालाही विकायला काढला आहे. शेतकऱ्यांना आपली बैल जोडी विकावी लागत असल्याचे धुळे जिल्ह्यातील शेतकरी सांगतायेत.
परंतु बैल जोडीला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी जेव्हा बैल जोडी घ्यायला जातो तेव्हा त्याला ती महाग दरात मिळते आणि जेव्हा तो बैल जोडी विकायला होतो तेव्हा ती स्वस्तात विकली जात असल्याची खंत शेतकऱ्यांची आहे. बैल जोडी सांभाळण्या इतपत आर्थिक खर्च पेलवणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता बैल जोडी विकायला सुरुवात केल्याच शेतकरी सांगताय. अवकाळी पाऊस, घरात साठवून ठेवलेला कापूस आणि त्यातच चाऱ्याचा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना गोधन सांभाळणे आता अवघड ठरत आहे. त्यामुळे आठवडे बाजारांमध्ये आता गोधन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावर दाखल होत आहेत.