Raj Thackeray: राज ठाकरेंची छगन भुजबळांवर टीका, पंकज भुजबळ आज थेट शिवतिर्थावर; भेटीचं कारण काय?
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. भोंग्याच्या मुद्द्यावरून राज यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आज थेट पंकज भुजबळच शिवतिर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हिरा ढाकणे, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली. भोंग्याच्या मुद्द्यावरून राज यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आज थेट पंकज भुजबळच (pankaj bhujbal) शिवतिर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पंकज भुजबळ राज यांच्या भेटीला येण्यामागचं कारण काय हे कळू शकलं नाही. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. आज सकाळीच भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरे यांची शिवतिर्थावर जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी राज यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचं समर्थन केलं. गुढी पाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांना भेटणाऱ्यांची यादी वाढताना दिसत आहे. गुढी पाडव्याच्या भाषणानंतर राज यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजप नेत्या शायना एनसी यांनीही भेट घेतली होती.
छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ काहीवेळापूर्वीच शिवतिर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्या हातात एक कागद होता. तसेच ते एकटेच शिवतिर्थावर आले आहेत. पंकज भुजबळ हे शिवतिर्थावर येण्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही भेट पूर्वनियोजित होती का हे सुद्धा समजू शकले नाही. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच राज ठाकरे यांनी भुजबळांवर टीका केली होती. त्यानंतर आज थेट पंकज भुजबळ हे राज यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज यांच्या नातवाला गिफ्ट
पंकज भुजबळ हे शिवतिर्थावर राज यांच्या नातवाला बघायला आल्याची माहिती आहे. पंकज यांनी सोबत राज यांच्या नातवाला गिफ्ट्स सुद्धा आणले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे आजोबा झाले आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठीची ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला शिवाजी पार्कावर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला होता. त्यावर छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी ठाण्यातील कालच्या भाषणात भुजबळांसहीत त्यांच्यावर टीका करणाऱ्या सर्व नेत्यांचा नाव घेऊन समाचार घेतला. भुजबळ साहेब तुमचे सीए, तुमच्या माणसामुळे केलेल्या कामामुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवरील टीकेवरून नाही जावं लागलं. दोन अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पहिला शपथविधी यांचा कसा होतो? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
चौकशीसाठी हजर व्हा, अन्यथा फरार घोषित करू, सोमय्यांना आर्थिक गुन्हेशाखेची नोटीस