Beed Nagar Panchayat: ‘ताई विरुद्ध भाऊ लढत नव्हती’, पंकजा मुंडेंनी बीडच्या निकालावर असं का म्हटलं?
केज नगरपंचायत निवडणुकीतदेखील भाजपने यश मिळवलंय. याविषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तोच पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या, बीडमध्ये एकसंध असा भाजप सोडून इतर कोणताही पक्ष नाही.
बीडः जिल्ह्यातील तीनही नगरपंचायती भाजपकडे आल्याचं चित्र दिसतंय. आष्टी, पाटोदा आणि शिरूरमध्ये भाजपची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. बीडमधील विजयी उमेदवारांचे तसेच राज्यभरातील भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं. यावेळी बीडमधील लढतीविषयी प्रश्न विचारला असता, त्या स्वतः या लढतीकडे कसे पाहतात, यावर प्रतिक्रिया दिली.
ताई विरुद्ध दादा, अशी लढत नव्हतीच!
बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होती का? असा प्रश्न विचारला असता भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, मुळात तुम्ही समजता तसे चित्र बीडमध्ये नाहीये. मी नेहमी सांगते, एका मतदारसंघाचं आणि संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व करणं यात फरक आहे. बीडचं जे चित्र आहे, ते लोकांनी स्पष्ट केलं आहे. सध्याच्या सरकारच्या कामकाजावरील लोकांचा राग आणि रोष तसेच आमच्या काळातील कामावरील विश्वास याचेच हे परिणाम आहेत. जिल्ह्यातील लोकांनी भविष्यातील निवडणुकीसाठीही कौल दिला आहे.
‘बीडमध्ये एकसंध असा एकच पक्ष’
केज नगरपंचायत निवडणुकीतदेखील भाजपने यश मिळवलंय. याविषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तोच पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या, बीडमध्ये एकसंध असा भाजप सोडून इतर कोणताही पक्ष नाही. प्रत्येकजण एकेका मतदारसंघाचा ठेका घेत आहेत. जिल्ह्याच्या भविष्यासाठी कुणीही काम करत नाहीत. पालकमंत्रीदेखील नाही.जिल्ह्यात भाजप हाच असा एकमेव पक्ष आहे, जो एकसंध राहून जिल्ह्याच्या भवितव्यासाठी काम करतो.
बीडमधील पाच नगरपंचायतींचे निकाल
बीडमधील केज, आष्टी ,पाटोदा, शिरूर आणि वडवणी या पाच नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. यापैकी आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतींवर भाजपने विजय मिळवल्याचे चित्र आहे. उर्वरीत दोन नगरपंचायतींचे निकाल काही वेळातच स्पष्ट होतील.
इतर बातम्या-