नाशिक : पंकजा मुंडे यांचं राजकारणात मोठं प्रस्थ आहे. त्यांचे महाराष्ट्रभर समर्थक आहेत. ओघवत्या भाषणशैलीने त्या हजारोंच्या सभा जिंकतात. सभा असो किंवा साधी बैठक त्या नेहमीच त्यांचे वडील म्हणजेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वेगवेगळे किस्से सांगतात. आजदेखील पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. पण यावेळी “मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघून म्हणते मी राजकारणात का आले” असे म्हणत पंकजांनी श्रोत्यांचे लक्ष्य वेधून घेतले.
पंकजा नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. “गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोकडे मी जास्त पाहात नाही; कारण माझ्या हृदयात कालवतं. मी त्यांच्या फोटोकडे न पाहता तिसरीडेच पाहते. मला वाटतं की माझे बाबा आज नाहीत. आज मी समोरच्या मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघत होते आणि विचार करत होते की मी राजकारणात का आले ? तसा प्रश्नही मी मुंडेसाहेबांना विचारला होता. त्यांनी सांगितलं ज्यांना कशाचा अधिकार नव्हता अशा लोकांचा आवाज बनावं लागेल. ज्यांचा कोणी वाली, ज्यांना कोणी मायबाप नाही अशा लोकांना राजकारणात आणण्यसाठी मी राजकारणात आलो. हा सगळा प्रवास माझ्याबरोबर संपून जाऊ नये म्हणून मी माझी मुलगी समाजाच्या झोळीत टाकली, असं त्यांनी मला सांगितलं होतं,” असं पंकजा म्हणाल्या.
तसेच पुढे बोलताना त्यांनी राजकारण आणि विकास यावर भाष्य केलं. “आता राजकारण या शब्दाचा अर्थच बदलला आहे. राजासारखं मन ठेवून काम करण्याची ज्याची इच्छा असते त्याला राजकारण म्हणायचं. जनतेचं हीत खड्ड्यात घालून पक्षाचं राजकारण करायचं यासाठी राजकारण नाही. प्रत्येकवेळी खुर्चीवरच बसायचं यासाठीदेखील राजकारण नाही,” असं पंकजा म्हणाल्या.
तसेच “आम्ही मराठवाड्यातून येतो. जिथे दुष्काळ, पाणी कमी, नोकऱ्या कमी, विकास कमी तिथे राजकारणच राजकारण. आमच्या काळात आम्ही खूप विकास केला. प्रत्येकाच्या घरापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम केलं. नाशिकच्या लोकांचं काम करण्याचं मला कौतूक वाटलं. माझं आणि नाशिकचं काही नातं आहे. मी प्रत्येक सणाला नाशिकला येते. माझं आणि तुमचं नातं आहे. मी माहेरीच येते. आता कळलं मला साहेबांनी राजकारणात का आणलं,” असे म्हणत त्यांनी त्यांना नाशिक शहराबद्दल असलेला लगाव बोलून दाखवला.
इतर बातम्या :
मलिकांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव का हटवलं? अमृता फडणवीस म्हणतात, तर काय चुकीचं आहे ?