डॉ. अब्दुल कलामांचा वेश, कामगिरीही धडाकेबाज, ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, का होतंय एवढं कौतुक?
उपक्रमात सहभागी झालेल्या ५ हजार विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातील ५३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यापैकी परभणीतील ११ विद्यार्थी सहभागी झाले होते.

नजीर खान, परभणी : डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्यासारखे महान वैज्ञानिक होण्याचं स्वप्न या देशातील अनेक मुलं आपल्या उराशी बाळगून असतात. यापैकी काही जणांना देशातील वैज्ञानिक (Scientist) क्रांतीमध्ये, महत्त्वाच्या वैज्ञानिक मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. परभणीच्या अशाच काही विद्यार्थ्यांना भारतासाठी गौरव ठरणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि या विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनंही केलं. तमिळवाडूत ही मोहीम फत्ते करून आलेल्या परभणीतील बालवैज्ञानिकांचं नुकतंच पुनरागमन झालं. शाळा तसेच संस्थांच्या वतीने या विद्यार्थ्यांचं परभणी रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात त्यांच्या कामगिरीला सलामी देण्यात आली.
काय केली कामगिरी?
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लाँच व्हेइकल मिशन २०२३ अंतर्गत तमिळनाडू येथील पट्टिपुलम येथून भारतातलं पहिलं हायब्रिड रॉकेट नुकतंच लाँच करण्यात आलं. बुधवारी या रॉकेटचं लाँचिंग पार पडलं. या उपक्रमात महाराष्ट्रातल्या ५३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अवकाश विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना यात संधी देण्यात आली.देशभरातील बालवैज्ञानिकांना ही संधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन मार्टिन ग्रुप आणि स्पेस झोन इंडिया यांच्या सहाकार्यातून मिळाली.
परभणीतले 17 विद्यार्थी
एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे नॅशनल कॉर्डिनेटर एम सुरेश, मिलिंद चौधरी, मनीषा चौधरी, मेघश्याम पत्नी राजकुमार भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतले 17 विद्यार्थी तमिळनाडूत गेले होते. त्यापैकी कल्पेश पत्नी याने रॉकेट, सॅटेलाइट प्रोग्रामिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आदित्य चौधरी, सात्विक आगरकर, अनन्य कुलथे, अक्षद चौधरी, कल्पना पत्की, यश भांबरे यांनी रॉकेट आणि सॅटेलाइट ट्रेनिंगची बाजू सांभाळली. तर निखिल कुलकर्णी, कृष्णा मंगवानी यांनी डॉक्युमेंट डिझाइन, तसेच इतर ग्राफिकची कामे पाहिली. तर युवराज भांबरे, प्रिया दळवी, विकास मुळे, अद्वेत मोरे, यज्ञेश भांबरे, वेदिका कुलथे यांनी इतर सहाकार्य केले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या 5 हजार विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातील 530 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना आधी 10 दिवसांचं ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आलं. महाराष्ट्रात पुणे, परभणी आणि नागपूर येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली होती. यातून प्रशिक्षण घेतल्यानंतर तमिळनाडू येथील पट्टीपुलम येथे विविध प्रकारचे 150 पिको सॅटेलाइट तयार करण्यात आले. हे सर्व सॅटेलाइट बुधवारी भारतातील पहिल्या हायब्रिड रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आले.