ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखपद मिळताच सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची मोठी कारवाई
Sudhakar Badgujar Police case registered | नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करुन अहवाल आयुक्तांना दिला. त्या अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते.
चंदन पुजाधिकारी, नाशिक | दि. 29 फेब्रुवारी 2024 : नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी दावेदारी आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहे. नाशिक पोलिसांनी अखेर या प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर बडगुजर यांची या प्रकरणात चौकशी सुरु होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण गाजले होते.
काय होते प्रकरण
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत सुधाकर बडगुजर नाचल्याचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर विधिमंडळात आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण उपस्थित केले होते. आमदार नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ विधानसभेत दाखवले होते. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.
सुधाकर बडगुजर यांची अनेकवेळा चौकशी
सलिम कुत्ता पार्टी प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची अनेक वेळा पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात पोलिसांनीपवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग यांच्यासह आतापर्यंत 17 ते 18 जणांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता.
बेकायदेशीर कृत्य केल्याचा गुन्हा
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करुन अहवाल आयुक्तांना दिला. त्या अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते. त्यानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सलिम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदेशीर कृत्य केल्याचा ८ वर्षांनी गुन्हा- सुधाकर बडगुजर
दरम्यान, या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले आहे. बेकायदेशीर कृत्य केल्याचा ८ वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे. दबावापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. राजकीय सुड बुद्धीने गुन्हा दाखल झाला आहे.