मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलल्याने त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्र सरकारलाच त्यात आणलं आहे. देशभर लॉकडाऊन केला. नोटाबंदी केली. मग भोंगा बंदीही देशभर करून टाका, असं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भोंगाबंदीचा निर्णय केंद्राच्या कोर्टात टाकून भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांना काय प्रत्युत्तर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राच्या कोर्टात भोंग्याचा विषय टाकल्याने या मुद्द्यावरून येणाऱ्या काळात राजकारण तापण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. भोंग्याचा मुद्दा गाजत आहे असं वाटत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल देशासाठी आहे. त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी बैठक घेतली. नोटाबंदी, जीएसटी, लॉकडाऊन देशभर केला ना मग भोंगाबंदी देशभर करा ना, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोर्टाने भोंग्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. या खटल्यात केंद्र सरकार पार्टी होती. मी निकाल वाचला नाही. खोटं बोलणार नाही. पण निकाल समजून घेतला. कोर्टाचा निकाल सर्व धर्मीयांना लागू होतो. पण मला तो मुद्दा गौण वाटतो. मला राज्याला पुढे न्यायचं आहे. गुंतवणूक करायची आहे. राज्याचा विकास करायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
योगी सरकारने भोंगे उतरवले. महाराष्ट्र सरकार ते का करत नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला गेला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेते फेकली होती. शेवटचे विधी झाले नाही. 70वर मुलं ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तडफडून मेली. अनेकांना उत्तर प्रदेशात ऑक्सिजन मिळाला. त्यामुळे तो मुद्दा भयानक आहे. उत्तर प्रदेशात किती जणांनी प्राण गमावले त्याचा आकडा अजून आला नाही. कोरोना काळता उत्तर प्रदेश सरकारने दुर्लक्ष केलं. काम केलं नाही. ते काम करून ते लोकप्रिय झाले नाही. हे करून लोकप्रिय होत असतील तर त्यांची लोकप्रियता त्यांनाच लखलाभ असो. मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरवले असले तरी परवानगी मागितली तर ते पुन्हा भोंगे लावायला परवानगी देणार आहेत. सर्वांनाच परवानगी लागणार आणि सर्वांनाच डेसिबल पाळावे लागेल. भजन किर्तन आणि मशिदीवरील भोंगे त्यात आले. म्हणजे योगींनी हिंदुत्वाचं काम नाही केलं तर सर्व धर्म समभावाचं काम केलं आहे. अजानतेपणी हे सर्व चाललं आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.