PM Narendra Modi : लतादीदींच्या नावाने मिळणारा पुरस्कार जनतेला अर्पण करतो; मोदींनी जागवल्या दीदींच्या आठवणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या आठवणींनी भावुक झाले. ते म्हणाले, मोठी बहीण म्हणून लतादीदींनी खूप प्रेम दिलं. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. यंदा जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतो. त्यामुळे मी आलो.
मुंबईः लदादीदींच्या नावाने मिळणारा पहिला पुरस्कार मी जनतेला अर्पण करतो. ज्याप्रमाणे लतादीदी जनतेच्या होत्या. त्याचप्रमाणे हा पुरस्कारही जनतेचा आहे, असे भावोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Deenanath Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज रविवारी, 24 एप्रिल रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित नव्हते. मात्र, याच वेळेत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ महिला शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांची भेट घेण्यासाठी भोईवाडा परळ इथल्या दाभोळकर वाडी येथे हजेरी लावली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत ताणल्या गेलेल्या संबंधाची प्रचिती आली.
मंगेशकर कुटुंबाची आहुती…
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संगीतासारख्या गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र, सांस्कृतिक दृष्ट्या संगीत ही साधना आणि भावना आहे असं मला वाटतं. अव्यक्तला व्यक्त करतात ते शब्द. ऊर्जेत चेतनेचा संचार करतो तो नाद. आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत. तुम्ही निस्पृह बसले आहात, पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने जीवनात वीररस भरतो. संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहोचवतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रूपामुळे साक्षात पाहिलं आहे. त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने या यज्ञात आहुती दिली असल्याचे ते म्हणाले.
यंदाच्या रक्षाबंधनाला दीदी नसतील…
पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या आठवणींनी भावुक झाले. ते म्हणाले, मोठी बहीण म्हणून लतादीदींनी खूप प्रेम दिलं. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतो. त्यामुळे मी आलो. मंगेशकर कुटुंबावर माझ्यावर हक्क आहे. आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बिझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या. मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो. लतादीदी जनतेच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पित करतो. मी विचार करत होतो की, दीदीशी माझं नातं कधीपासून किती जुनं आहे. कदाचित चार साडेचार दशक झाले असतील. सुधीर फडके यांनी माझा परिचय करून दिला होता. तेव्हापासून या कुटुंबासोबत अपार स्नेह अगणित घटना माझ्या जीवनाचा भाग बनल्या. माझ्यासाठी लतादीदी सूर साम्राज्ञीसह माझी मोठी बहीण होती. त्याचा मला अभिमान वाटतो, असं त्यांनी आवर्जुन नमूद केलं.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!