ज्या शिवरायांनी अभेद्य किल्ले बांधले त्यांचाच पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला, शिवप्रेमींमध्ये संताप
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. तसेच विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. संबंधित घटनेमुळे शिवप्रेमींममध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करुन या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.
विरोधकांकडून भ्रष्टाचारामुळे ही घटना घडल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, पुतळा कसा कोसळला याची सर्व कारणीमांसा जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी भेट देणार आहेत. राजकोट किल्ला परिसर पूर्णपणे पोलिसांनी वेढला आहे. किल्ल्याच्या आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुतळ्याच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मालवणच्या समूद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला परिसरात झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा 35 फुटांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र आज दुपारच्या दरम्यान हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा पुतळा नौदलाने उभारला होता. पण या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.
वैभव नाईक यांनी PWDचं कार्यालय फोडलं
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण येथील कार्यालयाची तोडफोड केली. निकृष्ट दर्जाचं काम होतं त्यामुळेच हा पुतळा कोसळला आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. तर भाजपकडूनही संशय व्यक्त केला जातोय. “पुतळा कोसळणं हा राजकारणाचा कट असण्याची शक्यता आहे”, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा गंभीर आरोप
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी या घटनेनंतर गंभीर आरोप केले आहेत. “शिवरायांचा पुतळा वर्षभराच्या आतच धाराशाही झाला. शिवरायांचं स्मारक घाई-गडबडीत तयार केलं गेलं. शिवरायांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता”, असा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.