पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. मात्र, पुणे दौऱ्यावर येणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, असा दावा केला जात होता. मात्र, पुणे महापालिकेत पंतप्रधान येण्याची ही इतिहासातली दुसरी घटना आहे, असा दावा आता काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. यापूर्वी 1961 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुणे महापालिकेला भेट दिली होती. त्यांनी एक सभाही घेतली होती, असा दावा काँग्रेसचे माजी नगरसेवर वीरेंद्र किराड यांनी केला आहे. आपले काका रोहिदास किराड हे त्यावेळी महापौर होते. तेव्हा पंडित नेहरू पुण्यात आले होते. ते जुने फोटोही त्यांनी दाखवले आहेत.
पानशेत पुराची पाहणी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा नाना कारणांनी चर्चेत आहे. कोणी ते पुण्यात येणारे पहिले पंतप्रधान आहेत म्हणून टिमकी मिरवत आहे, तर कोणी आणखी कशाने. मात्र, किराड यांनी पहिला दावा फोटो दाखवून खोडून काढला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणे हे गौरवास्पद आहे. मात्र, ते पुणे दौऱ्यावर येणारे पहिले पंतप्रधान नाहीत. यापू्र्वी 1961 मध्ये माझे काका रोहिदास किराड हे महापौर होते. त्यांच्या काळात पानशेतचा पूर आला. ही पाहणी करण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. त्यांनी महापालिकेत सभाही घेतली होती. त्यावळचे फोटो आपल्याकडे आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणारे पहिले पंतप्रधान आहेत, हा दावा चुकीचा असल्याचे ते म्हणाले.
दोनदा आले होते नेहरू
पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरू दोनदा आले होते, असा उल्लेखही समोर आलाय. मा. प. मंगुडकर यांनी आठवणीतील पुणे हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, 5 जून 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू पुण्याला आले होते. त्यावेळी वा. ब. गोगटे हे महापौर होते. त्यांच्या काळात 26 जानेवारी 1960 रोजी महापालिकेच्या कार्यालयाचे स्थलांतर झाले. विश्रामबाग वाडा येथून हे कार्यालय नवीन इमारतीत आले. त्यानंतर पाच महिन्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भेट दिली होती, असा उल्लेखही या पुस्तकात आहे.