मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन, मच्छिमारांचा विरोध, समुद्रातून बोटी निघाल्या
विशेष म्हणजे या बंदराला राज्यातील सर्व मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे. यामुळे राज्यातील सर्व कोळीवाड्यातून दिवसभर विरोध दर्शविण्यात येणार आहेत.

PM Narendra Modi Palghar Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमधील वाढवण बंदराचे भूमीपूजन करणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 76,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. आता या वाढवण बंदराला स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून विरोध केला जात आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उचलला असताना देखील प्रकल्प तेथे लादला जात आहे, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. या प्रकल्पाच्या निषेधार्थ मच्छीमार बांधवांकडून काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पालघरच्या सिडको मैदानात हा सोहळा होणार आहे. या बंदराला स्थानिक मच्छिमारांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून बोटीमध्ये काळे फुगे लावण्यात आले आहे. तसेच काही बोटींवर काळे झेंडेही पाहायला मिळत आहे. डहाणू खाडी असलेल्या अनेक मच्छीमारांनी या बंदराचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे या बंदराला राज्यातील सर्व मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे. यामुळे राज्यातील सर्व कोळीवाड्यातून दिवसभर विरोध दर्शविण्यात येणार आहेत.
पालघरमधीव वाढवण बंदराला स्थानिक भूमिपुत्रांचा तीव्र विरोध असूनही पंतप्रधान याचे भूमिपूजन करत आहेत, ही हुकूमशाही आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे वाढवण बंदर होऊ देणार नाही. पंतप्रधान भूमिपूजन करतील, त्याच वेळी आम्ही निदर्शने करून याचा तीव्र निषेध व्यक्त करु, अशी प्रतिक्रिया डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केली.
मोदींनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी
त्यासोबतच आज पालघरमध्ये ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे. मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हे पोस्टर संपूर्ण मुंबईत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी सरकारच्या भ्रष्टाचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडला नाही. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटनाच्या 8 महिन्यातच कोसळून भ्रष्ट सरकारचा चेहरा जनतेला दिसून आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने सरकारला सवाल विचारला आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अनेक पोस्टर्स लावले आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्णय केला आहे.