सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन सुरु असलेला वाद चिघळला, पोलीस-आंदोलक आमनेसामने, आता पुढे काय?
आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन सुरु असलेला वाद आता पेटलाय. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरु केल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला.
शंकर देवकुळे, टीव्ही 9 मराठी, सांगली : आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन सुरु असलेला वाद आता पेटलाय. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरु केलं. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावेळी आंदोलक शिवप्रेमींकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर पोलीसही आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केल्यानंतर तणाव निर्माण झालाय.
प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात येणार असल्याने भाजपचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी रस्ता रोको आंदोलन सुरु केलं. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलक शिवप्रेमींना ताब्यात घेतलं. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
सांगलीच्या आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद निर्माण झालाय. शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करणार होते. पण प्रशासनाकडून पुतळा बसवण्याला विरोध आहे.
शिवप्रेमींची पुतळा तात्काळ बसवण्याची मागणी आहे. त्यामुळे आष्टामध्ये मोठा वाद निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळपासून परिसरात पोलीस दाखल झाले. पण शिवप्रेमी देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
आष्टामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. त्यानंतर पुतळा परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आलंय.
प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समस्त शिवप्रेमी आणि भाजपाचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाआरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण पोलिसांनी तसं होऊ दिलं नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले.